पुणे - पुणे आणि परिसरात तापमानाने उच्चांक गाठला होता. शहरातील उपनगर परिसरात ४१ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले होते. मात्र, पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात घट होऊन मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.
शनिवारी (ता. २९) कमाल तापमानात किंचित घट होऊन कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पुणे आणि परिसरात रविवारी (ता. ३०) कमाल तापमान स्थिर राहणार असून, कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले जाईल. तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदवले जाईल.
आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहील. मंगळवारी (ता. १) कमाल तापमानात घट होऊन कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस नोंदविले जाईल. तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस नोंदविले जाईल. आकाश मुख्यतः ढगाळ राहून मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस...
कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस राज्यात हवामान स्थिर असणार आहे. त्यानंतर कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी (ता. १) वाशी, पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याचा घाट विभाग, तर बुधवारी (ता. २) अमरावती आणि यवतमाळ येथे विजांचा कडकडाट, मेघगर्जना, सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह गारा पडणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले.उड्डाणपुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू घोरपडी - गावातील मरीमाता झोपडपट्टीजवळ उड्डाणपुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू झाला. स्वामी विवेकानंद शाळेतील चौथी इयत्तेत शिकवणारा क्रीश सुभाज अंगरकर शुक्रवारी (ता. २८) शाळा सुटल्यापासून गायब होता. शुक्रवारी रात्री पालकांनी शोधशोध केल्यानंतर सापडला नाही.
पालकांनी शनिवारी दुपारी घोरपडी बाजार पोलिस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केल्यावर घोरपडी गावातील उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या खड्ड्याजवळ मुलाचे दप्तर आणि डब्बा दिसून आला. त्यानुसार अग्निशामक दलाच्या जवानांनी खड्ड्यातील पाण्यात शोध घेतला.
खड्डा १२ ते १४ फुटांचा असल्यामुळे त्यात सांडपाणी साचले होते. परिणामी, शोध कार्यात अडचण निर्माण झाली. खड्ड्यातील संपूर्ण पाणी बाहेर काढल्यानंतर मुलाचा मृतदेह दगडांच्या आड दिसून आला. अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्री अंधारात मृतदेहाला बाहेर काढले. पुढील तपासासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला आहे.
वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यजित आदमाने म्हणाले, ‘शनिवारी लहान मुलगा हरवल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार शोध घेतल्यावर खड्ड्याजवळ दप्तर आढळले. त्यानंतर रात्री उशिरा मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडल्यामुळे मुलगा तेथे कसा गेला. याचा शोध मुंढवा पोलिस घेऊन पुढील कारवाई करतील.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.