पुढील दहा वर्षांचा हवामानाचा वेध घेणार; डॉ. राजीवन यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

‘‘आतापर्यंत ऋतूचा अंदाज वर्तविणारे हवामान खाते नजीकच्या भविष्यात पुढील दहा वर्षांचा हवामानाचा वेध घेणार आहे. त्यासाठी शास्त्रशुद्ध यंत्रणा विकसित करण्यात आली आहे,’’ अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी येथे दिली. 

पुणे - ‘‘आतापर्यंत ऋतूचा अंदाज वर्तविणारे हवामान खाते नजीकच्या भविष्यात पुढील दहा वर्षांचा हवामानाचा वेध घेणार आहे. त्यासाठी शास्त्रशुद्ध यंत्रणा विकसित करण्यात आली आहे,’’ अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी येथे दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था’ (आयआयटीएम) येथे आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ क्‍लायमेट सर्व्हिसेस’ या परिषदेत ते बोलत होते. या वेळी हवामान खात्याचे उपमहासंचालक डॉ. एम. महोपात्रा, एस. झिबियाथ, एफ. लोसिओ, अर्चना शुक्‍ला आदी उपस्थित होते. डॉ. राजीवन म्हणाले, ‘‘हवामानाशी संबंधित कोणत्याही समस्येची उकल करणे, त्याचा अंदाज वर्तविणे हे एकाच देशाने करणे अवघड आहे. त्यासाठी विविध देशांनी एकत्रितपणे काम करणे आवश्‍यक आहे. ही परिषद त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे.’’ ‘‘संयुक्त राष्ट्रसंघाने दीर्घकालीन जागतिक समस्या निश्‍चित केल्या आहेत. विशेष म्हणजे या समस्या आर्थिक परिस्थितीशी संबंधित नसून, त्या सर्वाधिक हवामानाशी निगडित आहेत.’’ असे मत राजीवन यांनी व्यक्त केले. डॉ. महोपात्रा म्हणाले, ‘‘दुष्काळ, अतिवृष्टी आणि चक्रीवादळे यामुळे भारतीय उपखंडात हवामान अंदाजाचे महत्त्व जास्त आहे. जागतिक स्तरावर सातत्याने शंभर वर्षे निरीक्षणे घेऊन आणि हवामान अंदाज वर्तविल्याबद्दल देशातील पाच हवामान विभागांना विशेष दर्जा देण्यात आला आहे.’’ 

#RingRoad रिंगरोडमधून मेट्रो शक्य

अन्न सुरक्षेसाठी ‘हवामान अंदाज’
हवामानबदलाचा गेल्या दशकभरात सर्वांत जास्त परिणाम शेतीवर झाला. त्यामुळे शेती उत्पादन आणि अन्न सुरक्षा हा जगासमोरील महत्त्वाचा प्रश्‍न आहे. शाश्‍वत शेतीसाठी दहा ते शंभर वर्षांपर्यंतचे हवामान अंदाज वर्तविण्यासाठी जगभरातील हवामान शास्त्रज्ञ आणि संस्था यांनी एकत्रित समन्वयाने काम करणे गरजेचे असल्याचे मत परिषदेत व्यक्त करण्यात आले. भारतातही दहा वर्षांचा हवामानाचा पूर्वानुमान वर्तविण्यासाठी संशोधन सुरू आहे. पुढील वर्षभरात हा अंदाज देणे प्रत्यक्षात कार्यान्वित होईल, असे डॉ. राजीवन यांनी सांगितले.

जगातील प्रगत देशांत हवामानाचे दशकभराचा अंदाज वर्तविले जात आहेत. देशातील शास्त्रज्ञ यासाठी अचूक पद्धत विकसित करत आहेत. सुरुवातीला राष्ट्रीय स्तरावरील अंदाज वर्तविण्यात येईल. त्यानंतर राज्य अथवा स्थानिक पातळीवरील अंदाज वर्तविणे शक्‍य होईल.’’
- डॉ. एम. राजीवन, सचिव, पृथ्वी विज्ञान मंत्रालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weather Department will forecast the weather for the next ten years