पुण्यातील `या` महाविद्यालयात 'कोविड १९ - ताणतणावाचे व्यवस्थापन' या विषयावर वेबिनार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

एकदिवसीय राज्यस्तरीय वेबिनारमध्ये राज्यातील  विविध महाविद्यालयातील २५४ संशोधक अभ्यासकांनी सहभाग घेतला होता.​

औंध (पुणे) : लॉकडाउनचे पालन करत रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात 'कोविड १९ - ताण-तणावाचे व्यवस्थापन' या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय वेबिनार नुकताच झाला.

आणखी वाचा- लाॅकडाउन वाढणार; पण...

महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग, शारीरिक शास्त्र विभाग आणि ग्रंथालय विभागांमार्फत हे वेबिनार घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठा विद्या प्रसारक समाजाचे आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, त्र्यंबकेश्वर, नाशिक येथील प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ उपस्थित होते. एकदिवसीय राज्यस्तरीय वेबिनारमध्ये राज्यातील  विविध महाविद्यालयातील २५४ संशोधक अभ्यासकांनी सहभाग घेतला होता.

आणखी वाचा- पीएमपाच्या हजारो प्रवाशांच्या पासला मुदतवाढ

'कोविड १९ - मानसिक ताण तणावाचे व्यवस्थापन' या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. रसाळ म्हणाले  "कोरोना या साथीच्या रोगाच्या अगोदरही समाजात अनेक समस्या आल्या होत्या. विविध प्रकारची महायुद्धे, दुष्काळ, त्सुनामी, भूकंप, महापूर आणि वादळे इतर समस्यांमधून मानव मुक्त होऊन सक्षम झाला होता. आता कोरोना या संसर्गजन्य रोगामधूनही तो लवकर बाहेर पडेल. सध्या सर्व गोष्टी जागेवर थांबल्यामुळे, आपल्या मनात नैराश्याची भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपण शारीरिक आणि मानसिक प्रतिकारशक्ती वाढवायला पाहिजे. आज आपण घरी बसून आराम करीत आहोत परंतु आपल्या जीवनात सुख आणि आनंद नाही. कोरोना या साथीच्या रोगामुळे आपल्या मनात चिंता आणि भितीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे मनावरील ताण-तणाव वाढला आहे. आपल्या मनात एकाकीपणाची भावना निर्माण झाल्यामुळे आपल्याला झोप न येणे, भूक न लागणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडते. अशावेळी आपण मनाची ताकद वाढवायला पाहिजे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या परिस्थितीशी आपण समायोजन करायला हवे. आपला वेळ आवडत्या कामात घालवायला हवा. घरातल्यांशी आणि मित्रांशी संवाद करायला पाहिजे. सकारात्मक दृष्टीने जीवनाकडे पहायला हवे. दररोज चांगल्या विचारांची प्रार्थना करावी. तसेच आपल्यातील क्षमतेनुसार सर्व प्रसंगांना सामोरे गेल्यास आपण कोरोना या साथीच्या रोगातून लवकर मुक्त होऊ" असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले  "कोरोना या साथीच्या रोगामुळे संपूर्ण जग मानसिकदृष्ट्या विकलांग झाले आहे. त्यामुळे सर्व समाजाला मानसिक बळ देण्याच्या हेतूने 'कोविड १९- मानसिक ताण-तणावाचे व्यवस्थापन' या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. मानसिक स्वास्थ्य हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपण स्वतःला आवडणाऱ्या कलेत गुंतवायला पाहिजे. त्यामुळे आपल्या मनात जीवनाबद्दल सकारात्मकता दृष्टिकोन प्राप्त होईल जो माणसाला जगण्याचे नवे बळ देतो. त्यामुळे एक दिवसीय राज्यस्तरीय वेबिनारमुळे अनेकांना जगण्याचे नवे बळ मिळेल" असा आशावाद त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: webinar in dr ambedkar college in pune