पुणे : 'वेट लॉस' सेंटरवर आली पैसे परत करण्याची वेळ!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

आयन मॅग्नम या मशिनद्वारे 45 मिनिटांची एक अशा 10 थेरपी घेतल्यास वजन कमी होईल, असे कंपनीने तक्रारदारांना सांगितले. ​

पुणे : वजन कमी करण्यासाठी थेरपी सुरू केल्यानंतर संबंधित सेंटर स्थलांतरित करण्यात आलं. त्यामुळे न घेतलेल्या उपचाराचे पैसे कंपनीला उपचार घेणाऱ्या महिलेला परत द्यावे लागणार आहे. न घेतलेल्या थेरपीचे 12 हजार 960 रुपये आणि मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी आणि तक्रारखर्च म्हणून 20 हजार रुपये कंपनीने तक्रारदाराला द्यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.

या बाबत अन्नपूर्णा एस. माधवनवर (रा. घोरपडी) यांनी डिफाईन एस्थेटिक्‍स (एन.आय.बी.एम रस्ता, कोंढवा) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्या क्षीतिजा कुलकर्णी आणि संगीता देशमुख यांनी हा आदेश दिला.

'तारीख पे तारीख मिलती रही है, लेकिन इन्साफ नही मिला, माय लॉर्ड'

आयन मॅग्नम या मशिनद्वारे 45 मिनिटांची एक अशा 10 थेरपी घेतल्यास वजन कमी होईल, असे कंपनीने तक्रारदारांना सांगितले. त्यासाठी 20 हजार 600 रुपये फी निश्‍चित करण्यात आली. 30 जुलै ते 11 नोव्हेंबर 2017 दरम्यान ही थेरपी घेण्याचा करार दोघांत झाला होता. थेरपीचे सेंटर तक्रारदार यांच्या घराजवळ असल्याने व त्यांच्या वेळेत तेथे जाणे शक्‍य असल्याने त्यांनी थेरपी घेण्याचे ठरवले.

मात्र तीन थेरपी घेतल्यानंतर कंपनीने उपचाराचे सेंटर फातिमानगर येथून कोंढव्यात स्थलांतरित केले. त्यामुळे थेरपीसाठी जाऊन येण्यास तक्रारदारांना उशीर होत. तसेच तक्रारदारांच्या घरी वृद्ध आई असल्यामुळे त्यांना संध्याकाळी सातनंतर उपचारासाठी जाणे शक्‍य नव्हते. त्यामुळे पुढील थेरपी घेणे शक्‍य नसल्याने त्याचे पैसे परत देण्याची मागणी तक्रारदार यांनी केली. मात्र त्यास कंपनीने नकार दिला.

अख्खं गावच करावं लागलं सील; हिमाचल प्रदेशात सर्वात मोठी कारवाई​

कंपनीने अनुचित व्यापार प्रथेचा वापर केला
कंपनीने कोणत्याही न्यायोचित कारणांशिवाय रक्कम परत केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान करून अनुचित व्यापारी प्रथेचा वापर केला, असे आयोगाने आदेशात नमूद केले आहे. तक्रारदार यांनी थेरपीसाठी दिलेल्यापैकी 12 हजार 960 रुपये, मानसिक त्रासापोटी 25 हजार रुपये आणि तक्रारखर्च म्हणून पाच हजार रुपये देण्याची मागणी करणारी तक्रार आयोगात दाखल केली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: weight loss company will have to pay Rs 20000 to complainant in Pune