अख्खं गावच करावं लागलं सील; हिमाचल प्रदेशात सर्वात मोठी कारवाई

वृत्तसंस्था
Thursday, 14 January 2021

बंजारचे पोलिस उपअधीक्षक बिन्नी मिन्हास यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. बंजार पोलिसांनी याआधीही अशाप्रकारची कारवाई केली असून आताच्या छाप्यात सापडलेला साठा आतापर्यंतचा सर्वात मोठा साठा आहे.

शिमला : एखाद्या ठिकाणी सेल्स टॅक्स, अँटी ड्रग्ज स्क्वॉड (अमली पदार्थ विरोधी पथक), पोलिस किंवा इतर कुणी छापा मारल्यावर ती संबंधीत जागा किंवा बिल्डींग सील केल्याचं आपण ऐकलं, पाहिलं आहे. पण पोलिसांनी छापा टाकल्यानंतर अख्ख गावच सील करावं लागल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का?

हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यातील एक अख्खं गावचं सील करण्यात आलं आहे. कुल्लू पोलिसांनी अमली पदार्थविरोधात मोहीम हाती घेतल्यावर आतापर्यंतचा सर्वात मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. बंजारमधील श्रीकोट पंचायतीमधील शिजाहू गावात तब्बल १११ किलो चरस सापडले आहे. यावेळी दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेत अख्खं शिजाहू गाव सील केलं आहे. 

SC च्या समितीतून एकाचा काढता पाय; शेतकऱ्यांच्या हितासाठी आधीच माघार​

मिळालेल्या माहितीनुसार, शिजाहू गावातील एका चरस माफियाकडे मोठा अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याचा पाठवुरावा करत पोलिसांनी सदर अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यावेळी पोलिसांनी एक पुरुष, एक महिला असं दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर एनडीपीएस (अमली पदार्थविरोधी कायदा) च्या कलम २०नुसार गुन्हा दाखल केला आहे.

वाराणसीत 5 कोटी रुपये किंमतीचा गांजा जप्त; दोघांना अटक​

बंजारचे पोलिस उपअधीक्षक बिन्नी मिन्हास यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. बंजार पोलिसांनी याआधीही अशाप्रकारची कारवाई केली असून आताच्या छाप्यात सापडलेला साठा आतापर्यंतचा सर्वात मोठा साठा आहे. गेल्या वर्षी ४२ किलो चरससह चार जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांबाबत तपास केला जात आहे. आतापर्यंत कुल्लू पोलिसांनी तीन कोटी रुपये किंमतीची बेकायदेशीर संपत्तीसह दोघांना अटक केली असल्याची माहिती कुल्लूचे पोलिस अधीक्षक गौरव सिंह यांनी दिली. 

किमान 50 आमदारांचे इनकमिंग होईल; भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ​

थंड हवेची अनेक ठिकाणं असल्याने हिमाचल प्रदेशमध्ये पर्यटकांची वर्दळ असते. देशभरातून हजारोंच्या संख्येत पर्यटक येथे येतात. त्यामुळे अमली पदार्थाचा व्यवसायही येथे जोर धरत आहे. छुप्या पद्धतीने चालणाऱ्या या व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Himachal Pradesh 111 kg of charas was found in police raid entire village sealed off