#WeTheIndians कातकरी मुले शिकताहेत अ... ब... क...

सुवर्णा चव्हाण
रविवार, 19 ऑगस्ट 2018

पुणे - तो ही त्या कातकरी वस्तीतला... पण, जिद्द आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर त्याने पदवीचे शिक्षण घेतले. कुपोषण, बेरोजगारी अन्‌ शिक्षणापासून दूर असलेल्या त्याच्याच कातकरी समाजातील मुलांचे आयुष्य बदलण्यासाठी तो कामाला लागला... ‘डोनेट एड सोसायटी’च्या प्रकल्पात त्याने कामास सुरवात केली... सचिन आकरे असे त्याचे नाव... त्याच्यासारखे आज कित्येकजण सोसायटीच्या माध्यमातून महिला व मुलांचे कुपोषण दूर करण्यासह मुलांच्या शिक्षणासाठी झटत आहेत. आता ही मुले अ... ब... क.. चे धडे गिरवत आहेत.

दिशा कातकरी विकास केंद्र या प्रकल्पांतर्गत २०१५ पासून पौड येथील आंदेशे आणि इंदिरानगर कातकरी वस्तीमध्ये सोसायटीतर्फे वेगवेगळे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. महिला व मुलांमधील कुपोषण दूर करण्यासाठी त्यांना पोषक आहार पुरविला जातो. तसेच, मुलांसाठी वस्तीतच डे-केअर सेंटरही चालविले जाते. काही मुले शाळेत जात नाहीत, त्यांना सोसायटीचे प्रतिनिधी शाळेपर्यंत सोडतात. तसेच, शैक्षणिक वर्गाच्या माध्यमातून गप्पा, गोष्टी, गाणी आणि खेळांमधून मुलांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष दिले जात आहे.

सोसायटीचे समन्वयक नितीन घोडके म्हणाले, ‘‘आम्ही पौड येथील दोन वस्त्या दत्तक घेतल्या आहेत. त्यातील ४५ मुलांच्या शैक्षणिक जडण-घडणीसाठी काम करतो. तसेच, वस्तीतल्या नागरिकांना सरकारी योजनेतून स्वतःची घरेही उपलब्ध करून दिली आहेत. त्यांची बांधकामे सुरू आहेत. आता या लोकांचे राहणीमान बदलत आहे. कुपोषण हा त्यांचा मूळ प्रश्‍न होता. तोही दूर होत आहे.’’

गरजूंसाठी जुने कपडे
डोनेट एड सोसायटीमार्फत समाजातील दानशूर व्यक्तींकडून जुने कपडे गोळा करून ते कातकरी वस्तीतल्या गरजू लोकांना दिले जात आहेत. त्यासाठी पौड येथील कातकरी वस्तीत एक दुकानही उघडले आहे. 

घर मिळाले हक्काचे
सरकारच्या शबरी घरकुल योजनेतून मिळालेले अनुदान आणि रेलफोर फाउंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) पौड येथील आंदेशे व इंदिरानगर कातकरी वस्तीत आणि शिरूर येथे अमदाबाद गावात काही घरे बांधून देण्यात येत आहेत.

Web Title: #WeTheIndians Katkari Society Child Education