बालगंधर्वला पर्याय काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balgandharva Rangmandir
बालगंधर्वला पर्याय काय?

बालगंधर्वला पर्याय काय?

पुणे - बालगंधर्व रंगमंदिराच्या (Balgandharva Auditorium) पुनर्विकासाचा (Redevelopment) आराखडा तयार झाला असून लवकरच त्यासंबंधी कार्यवाही सुरू होण्याची शक्यता आहे. पुनर्विकासासाठी नाटकाचे माहेरघर असेलेले बालगंधर्व रंगमंदिर काही वर्षांसाठी बंद राहणार आहे. मात्र या परिस्थितीत बालगंधर्वला पर्याय काय?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरात इतर काही नाट्यगृहांचे पर्याय उपलब्ध असले, तरी ती समस्यांच्या गर्तेत अडकली आहेत. त्यामुळे या नाट्यगृहांमधील त्रुटी लवकरात लवकर दूर करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.

शहरात महापालिकेचे विविध नाट्यगृहे असली तरी नाट्यप्रयोगासाठी रंगकर्मींची बालगंधर्व रंगमंदिरालाच सर्वाधिक पसंती मिळत असे. त्याखालोखाल कोथरुड परिसरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह व बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाला पसंती मिळते. मात्र उपनगरातील तीन ते चार नाट्यगृहांमध्ये फारसे नाट्यप्रयोग होत नसल्याचे चित्र आहे. या नाट्यगृहांमध्ये नाटकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने येथे नाट्यप्रयोग करू शकत नसल्याची कैफियत रंगकर्मींनी मांडली होती. ‘सकाळ’ने याबाबत वृत्तही प्रकाशित केले होते.

आता बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकासासाठी बंद राहिल्यास साहजिकच इतर नाट्यगृहांमध्ये प्रयोग होतील. त्यामुळे पुनर्विकासाचे काम सुरू होण्यापूर्वी या नाट्यगृहांमधील समस्या सोडवण्यात याव्या, अशी मागणी रंगकर्मींनी केली आहे. बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात ध्वनीक्षेपक नाहीत. गंज पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले नाट्यगृहात नाटकासाठी माईक नाहीत, नेपथ्याचे साहित्य नाही. तसेच, येथील वातानुकूलित यंत्रणा बिघडली असून मेकअप रुमचीही दुरावस्था आहे. वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन, येरवडा येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कलामंदिर, औंध येथील भीमसेन जोशी कलामंदिर आदी नाट्यगृहांमध्येही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचे काम सुरू करण्यापूर्वी या त्रुटी दूर करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे.

महापालिकेच्या ताब्यातील पर्यायी नाट्यगृहे व त्यांची आसनक्षमता -

१) यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड - ८९३

२) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, बिबवेवाडी - ८००

३) ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले नाट्यगृह, गंज पेठ - ४७५

४) महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी - ७१३

५) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कलामंदिर, येरवडा - ६५०

६) भीमसेन जोशी कलामंदिर, औंध - ५९०

‘कोरोनानंतर प्रेक्षकही नाटक पाहायला उत्सुक आहेत. त्यामुळे नाटकांना गर्दी होत आहे. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराचे काम सुरू असताना इतर सशक्त पर्याय उपलब्ध असणे गरजेचे आहे. पर्यायी नाट्यगृहांमध्ये चांगल्या सुविधा दिल्यास तिथेही नाट्यप्रयोग नक्कीच होती. मात्र त्यासाठी या नाट्यगृहांमधील समस्या सोडवणे गरजेचे आहे.’

- प्रवीण बर्वे, नाट्य व्यवस्थापक

Web Title: What Is The Alternative Option To Balgandharva Auditorium

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top