
दहावीच्या अंतर्गत मुल्यमापनासाठी ‘व्हॉटस्ॲप’चा सर्वाधिक वापर
पुणे : दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न, कृतीपत्रिका, गृहपाठ व्हॉटस्ॲपद्वारे पालकांच्या मोबाईलवर पाठवून ते विद्यार्थ्यांकडून सोडवून घेण्याचा पर्याय गेल्या वर्षभरात राज्यात सर्वाधिक वापरला गेला. अशा पद्धतीने राज्यातील जवळपास १२ हजार २९८ शाळांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन यापूर्वीच केले असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) ‘दहावीच्या अंतर्गत मुल्यमापनासाठी शाळा तयारी आहेत का!’ हे जाणून घेण्यासाठी नुकतेच एक सर्वेक्षण हाती घेतले होते. याअंतर्गत राज्यातील शाळांनी वर्षभर कशाप्रकारे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यमापन केले, हे देखील जाणून घेण्यात आले. यात शाळांनी ऑनलाइन टेस्ट, व्हॉटस्ॲप, ऑनलाइस सेशन, ऑफलाइन टेस्ट, गृहभेटी, वर्क बूक आणि अन्य पर्याय वापरले आहेत. त्यातील बहुतांश शाळांनी व्हॉटस्ॲप, ऑनलाइन टेस्ट, ऑफलाइन टेस्ट, वर्क बुक असे बहुपर्याय वापरून मुल्यमापन केल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
हेही वाचा: पुण्यात लाखभर ज्येष्ठ लसीविना; २.७१ लाख ज्येष्ठांनी घेतला पहिला डोस
राज्यातील २५ हजार ९२७ शाळांपैकी ४९.८७ टक्के म्हणजेच १२ हजार ९३१ शाळा सर्वेक्षणात सहभागी झाल्या आहेत. यात सर्वाधिक शाळांनी व्हॉटस्ॲपचा वापर केल्याचे दिसून आले. जवळपास १२ हजार २९८ शाळांनी व्हॉटस्ॲपचा, तर नऊ हजार ९३० शाळांनी ऑफलाइन आणि नऊ हजार ७५८ शाळांनी ऑनलाइन टेस्टचा वापर केला आहे. कोरोना काळातही विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकांचे प्रमाणही उल्लेखनीय असल्याचे निदर्शनास येत आहे. तब्बल सात हजार ३५२ शाळांमधील शिक्षकांनी गृहभेटीद्वारे विद्याथ्यांचे मुल्यमापन केले आहे. तर आठ हजार ४०२ शाळांनी विद्यार्थ्यांना वर्क बुक देऊन त्या भरवून घेतल्या आहेत.
‘‘दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन शाळांनी नेमके कशा पद्धतीने केले आहे, हे जाणून घेण्यासाठी शाळांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यात ऑनलाइन, ऑफलाइन अध्ययन, अध्यापन अहवाल नोंदणी करणे शाळांना सोईस्कर ठरले. त्यातून शाळांनी मुल्यमापनासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या ही माहिती समोर आली.’’
- विकास गरड, उपसंचालक, एससीईआरटी
सर्वेक्षणातून सहभागी शाळा :
एकूण शाळा : २५,९२७
सर्वेक्षणात माहिती दिलेल्या शाळा : १२,९३१
हेही वाचा: भारतीय व्हेरियंटवर लस, कोरोनावरील उपचार प्रभावी; WHOचा निर्वाळा
अंतर्गत मूल्यमापनासाठी शाळांनी वापरलेले पर्याय :
- अंतर्गत मूल्यमापनाची पद्धत : शाळांची संख्या (एका शाळेने मूल्यमापनासाठी एकापेक्षा जास्त पर्यायही वापरले)
- ऑनलाइन टेस्ट : ९,७५८
- व्हॉटस्ॲप : १२,२९८
- ऑनलाइन सेशन : ८,४०१
- ऑफलाइन टेस्ट : ९,९३०
- गृहभेटी चाचणी : ७,३५२
- वर्क बुक : ८,४०२
- अन्य पर्याय: ३,६४३
Web Title: Whatsapp Is Most Used For Internal Evaluation Of
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..