'व्हॅाटसअप'ने चार तासात लागला मुलाचा शोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Om pawar
'व्हॅाटसअप'ने चार तासात लागला मुलाचा शोध

'व्हॅाटसअप'ने चार तासात लागला मुलाचा शोध

दौंड - रेल्वे प्रवासात मध्यरात्री निर्जन रेल्वे स्थानकावर (Railway Station) उतरलेल्या एका सात वर्षीय बालकाचा (Child) शोध घेण्यासाठी व्हॅाटसअप (Whatsapp) उपयोगी ठरले आहे. मुलगा बेपत्ता झाल्याने पवार कुटुंबियांवर संक्रांत आली होती परंतु व्हॅाटसअपचा सकारात्मक वापर केल्याने अवघ्या चार तासात बालकाचा शोध घेण्यात दौंड लोहमार्ग पोलिसांना यश आले.

कल्याण येथून लातूर कडे जाण्यासाठी लक्ष्मीचंद व मोहिनी पवार (रा. डोंबिवली, जि. ठाणे) हे दांपत्य मुले आणि नातेवाईकांसह मुंबई - लातूर एक्सप्रेसने प्रवास करीत होते. १४ जानेवारी रोजी मध्यरात्री मलठण (ता. दौंड) रेल्वे स्थानकावर क्रॅासिंगकरिता एक्सप्रेस थांबली असता सात वर्षीय ओम लक्ष्मीचंद पवार हा गाडीतील आरक्षित डब्ब्यातून स्टेशनवर उतरला. सिग्नल मिळाल्याने एक्सप्रेस सोलापूरच्या दिशेने रवाना झाली मात्र ओम फलाटावरच राहिला. ओमच्या पालकांना तो जागेवर नसल्याचे लक्षात आले परंतु तोपर्यंत एक्सप्रेस कुर्डूवाडी पोचली होती.

हेही वाचा: पुणे : बिल्डरांना दिलासा; प्रीमियम FSIJ शुल्क भरण्यास मुदतवाढ

पवार कुटुंबीयांनी ही बाब लोहमार्ग पोलिसांना सांगितल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी तातडीने व्हॅाटसअपद्वारे मुलाचे छायाचित्र व वर्णन दौंड - सोलापूर, दौंड - पुणे व दौंड - नगर लोहमार्गावरील रेल्वे स्थानक व धावत्या रेल्वेागड्यांमधील लोहमार्ग पोलिस, रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांना कळविली. दरम्यान ओम पवार हा मलठण स्थानकाच्या एका बाजूला बसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाल्याने त्यांनी व्हॅाटसअप वरील छायाचित्र व वर्णन जुळल्याने त्याला ताब्यात घेत पोलिसांना कळविले. पोलिसांनी ओम यास पालकांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

लक्ष्मीचंद दशरथ पवार हे एका खासगी वित्तीय संस्थेत नोकरीस असून लातूर येथे सासर्यांच्या घराच्या पायाभरणी कार्यक्रमास सहकुटुंब निघाले होते.

दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे फौजदार ताराचंद सुडगे, हवालदार एकनाथ लावंड, अजित सावंत, संतोष पवार, सर्फराज खान, रमेश पवार, पोलिस नाईक सुरेखा बनसोडे, दौंड रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक तेजप्रकाश पाल, फौजदार सुनील यादव व प्रदीप गोयेकर यांनी शोधमोहिमेत भाग घेतला होता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :whatsapp
loading image
go to top