इंदापुर तालुक्यातील सावकारीवर कारवाई कधी?

प्रा. प्रशांत चवरे
Tuesday, 24 November 2020

तालुक्याला वाळू माफिया, माती माफियाबरोबर सावकारकीचे ग्रहण लागले आहे.

भिगवण : इंदापुर तालुक्यातील व्यावसायिक व सर्वसामान्य माणुसही सावकारीच्या जाळ्यात अडकल्याचे विदारक चित्र सर्वत्र येथे दिसत आहे. सावकारीचा विळखा वाढत असताना त्यांच्या दहशतीमुळे तक्रार देण्यासही कोणी पुढे येत नाही व प्रशासन मात्र तक्रारीची वाट पहात आहे. सर्वसामान्यांच्या पायात रुतलेला सावकारकीचा काटा त्याचे कुरुप होण्यापुर्वीच काढावा अशी मागणी सर्वसामान्य माणसांकडून होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बारामती तालुक्यात प्रशासनाने सावकरांच्या विरोधात गुन्हे दाखल करुन कारवाई केल्यानंतर बारामती तालुक्यातील सावकारांविरुध्द तर कारवाई झाली इंदा्पुर तालुक्यातील सावकारांविरुध्द कारवाई कधी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शेती, व्यवसाय आदींची सुबत्ता असलेला इंदापुर तालुका हा मागील काही दिवसांमध्ये अवैध व्यवसायाचे आगार बनत चालला आहे. तालुक्याला वाळू माफिया, माती माफियाबरोबर सावकारकीचे ग्रहण लागले आहे. व्यसनाधीनता, अति महत्वकांक्षा, व्यवसायातील अपयश यासारख्या कारणांमुळे अनेक व्यक्ती या सावकाराच्या पाशात अडकल्याचे चित्र येथे दिसत आहे.

तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या भिगवण, इंदापुर आदी पेठांना सावकारकीचे ग्रहण लागले आहे. सावकारांकडून एक दिवस, आठवडा, महिना व  वर्षानुसार व्याजाचे दर आकारले जात आहे. मुद्दलाच्या अनेक पट रक्कम वसुन केल्यानंतरही वसुली सुरुच असल्यामुळे सावकारीच्या पाशात अडकलेल्या अनेकांना देशोधडीला जावे लागल्याची उदाहरणे तालुक्यामध्ये दिसुन येत आहे. सावकाराच्या गळाला लागलेले चांगले व्यवसाय असणाऱ्या अनेक जण मोलमजुरीवर आल्याचे चित्र येथे दिसत आहे. इंदापुर तालुक्यासह इतरही तालुक्यातील सावकार येथे बस्तान मांडून असल्याचे चित्र दिसत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोक काय म्हणतील या भावनेने सावकारकिचा शिकार झालेली मंडळी रात्रीत पोबारा होत असुन एकेकाळी वैभव संपन्न असलेली अनेक कुटुंबे सावकारकीमुळे विस्थापित झाल्याचे विदारक चित्र येथे पहावयास मिळत आहे. अवैदय व्यवसायातुन पैसा, पैशातुन राजकारण असे समिकरण सध्या इंदापुर तालुक्यामध्ये रुढ झाले आहे. प्रशासनाने सावकारीच्या विळख्यात अडकलेल्या सर्वसामान्यांच्या आत्महत्येची वाट न पाहता कारवाईचा बडगा उचलावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: when is the action taken against the lender in Indapur taluka?