पुणे जिल्ह्यातील कोणत्या भागाला मिळणार प्रॉपर्टी कार्ड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

योजनेचे फायदे 

  • विकसित ५० टक्के भूखंडावर अडीच एफएसआय मिळणार 
  • शेती ना विकास झोनचे रहिवासी झोनमध्ये रूपांतर होणार 
  • जमिनीचे टायटल क्‍लीअर होणार 
  • सातबारा उतारा संपुष्टात येणार 
  • प्रत्येक जमीनमालकाला प्रॉपर्टी कार्ड मिळणार 
  • २५० हेक्‍टर टीपी स्कीमचे क्षेत्र
  • ५० टक्के भूसंपादनाच्या बदल्यात विकसित जागा
  • ६००० प्रॉपर्टी कार्ड

पुणे - पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सुमारे अडीचशे हेक्‍टरवरील म्हाळुंगे-माण टीपी स्कीमच्या ले-आउटला राज्य सरकारने नुकतीच अंतिम मंजुरी दिली आहे. त्यामुळे या योजनेतील सुमारे सहा हजार खातेदारांना आता प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव लवकरच प्राधिकरणाकडून भूमी अभिलेख विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘पीएमआरडीए’ने म्हाळुंगे-माण ‘हाय टेक सिटी’ प्रारूप नगर योजनेस सप्टेंबर २०१८ मध्ये मंजुरी दिली होती. त्यानंतर या योजनेवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या. दाखल हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी राज्य सरकारकडून लवाद म्हणून धनंजय खोत यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. खोत यांनी संबंधित जमिनीच्या मालकांची संवाद साधून ही योजना अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे सादर केली होती. राज्य सरकारने या योजनेला १२ डिसेंबर २०१९ रोजी अंतिम मान्यता दिली. त्यामुळे ही योजना राबविण्यातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. 

दप्तराचे ओझे होणार कमी; बालभारती राबविणार 'एक पुस्तक' उपक्रम

मान्यता मिळाल्यामुळे आता पुढील टप्पा योजनेतील खातेदारांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा राहणार आहे. त्यासाठी या योजनेचे मंजूर नकाशे ‘पीएमआरडीए’कडून भूमी अभिलेख विभागाला पाठविले जाणार आहेत. त्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून या योजनेतील सुमारे सहा हजार खातेदारांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे, अशी माहिती खोत यांनी दिली. त्यामुळे या सर्व खातेदारांना कायदेशीर हक्काचा पुरावा प्राप्त होण्यास मदत होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Which part of Pune district will get the property card