कचरा जाळतोय कोण?

कचरा जाळतोय कोण?

पिंपरी - आकुर्डी आणि चिंचवड रेल्वे स्टेशन जोडणाऱ्या नवीन रस्त्यालगतच्या कचरा संकलन केंद्राजवळ दररोज मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात आहे. त्याचा परिसरातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. महापालिकेचे कर्मचारी कचरा जाळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मात्र, आम्ही कचरा जाळत नसल्याचे महापालिका कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मग, कचरा जाळतोय कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

आकुर्डीतील दळवीनगर उड्डाण पूल आणि चिंचवड स्टेशनदरम्यान लोहमार्गाला समांतर रस्ता महापालिकेने दोन वर्षांपूर्वी निर्माण केला. त्यामुळे पांढारनगर, गंगानगरमार्गे आकुर्डी रेल्वे स्टेशन व प्राधिकरणाचा भाग चिंचवड स्टेशनशी जोडला गेला आहे. परिणामी, रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या रस्त्यालगत चार उच्चभ्रू सोसायट्या असून, लोहमार्गापलीकडे उद्योगनगरमधील गृहनिर्माण सोसायट्या आहेत. या नवीन रस्त्यालगत मोकळी जागा असल्याने महापालिकेच्या ‘अ’ प्रभागांतर्गत कचरा संकलन केंद्र आहे. या ठिकाणी आकुर्डीगाव, प्राधिकरण, खंडोबा माळ परिसरातील घंटागाडीद्वारे घरातून गोळा केलेला कचरा आणला जातो. तिथे कंटेनरमध्ये टाकला जातो. त्यातून कॉम्पॅक्‍टर वाहनाद्वारे मोशी कचरा डेपो येथे नेला जातो. तरीही मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात असल्याने त्यापासून निघणाऱ्या धुराचा त्रास होत आहे. 

नागरिक म्हणतात, पालिकेचे कर्मचारी कचरा जाळतात
कर्मचारी म्हणतात, आम्ही कचरा उचलून नेतो

स्थानिक नागरिकांचा आरोप
आकुर्डी व चिंचवड स्टेशन रस्त्याच्या कडेला दिवसरात्र कचरा जाळला जात आहे. त्याच्या धुरापासून बचाव करण्यासाठी कायमस्वरूपी घराचे दरवाजे बंद ठेवावे लागतात. महापालिकेकडे तक्रारी करून उपयोग होत नाही. या धुराचा ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना खूप त्रास होत आहे. रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांनाही त्रास होत आहे. शुद्ध हवा घेण्यासाठी मॉर्निंगवॉकला जावे, तर कचऱ्याची दुर्गंधी आणि धुराचाच त्रास जास्त होतो. त्यामुळे काही जण पुणे-मुंबई महामार्गानेच मॉर्निंगवॉकला जातात.

पालिकेचे कर्मचारी म्हणाले...
आकुर्डी ते चिंचवड स्टेशन रस्त्याने जाणारे काही नागरिक वाहनातून येऊन कचरा फेकून निघून जातात. काही जण राडारोडा आणून टाकतात. आम्ही सांगूनही ऐकत नाहीत. आमचे कर्मचारी घंटागाडीद्वारे घरोघरचा कचरा गोळा करून येथे आणून कुंडीत टाकतात. खाली पडलेला कचराही गोळा केला जातो. कुंडीतील कचरा मोशी डेपोत नेला जातो. दररोज सकाळी पाच ते दुपारी १२ आणि दुपारी १२ ते सायंकाळी सात अशा दोन शिफ्टमध्ये आमचे काम चालते. पण, आम्ही कचरा जाळत नाही. नागरिकांचा आमच्याविषयी गैरसमज आहे. 

रस्त्यावर कचरा पसरलेला असतो. मोठ्या प्रमाणात जाळला जातो. वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून दखल घेतली जात नाही. दिवसरात्र धुराचा त्रास होतो. त्यामुळे घरांचे दरवाजे बंदच ठेवावे लागतात.  
- शशिकांत गायकवाड,  सोनिग्रा ओपल सोसायटी, चिंचवड स्टेशन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com