पिंपरी-चिंचवड तिजोरीच्या चाव्या कोणाकडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

आठ सदस्य बदलणार
महापालिका स्थायी समितीचे सोळा सदस्य आहेत. त्यातील आठ सदस्य दरवर्षी बदलले जातात. त्यामुळे महिना अखेरीस आठ सदस्य नव्याने नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी भाजपतील इच्छुकांनी आमदार महेश लांडगे व लक्ष्मण जगताप यांच्याकडे ‘फिल्डिंग’ लावली आहे.

पिंपरी - महापालिका स्थायी समिती अध्यक्षांची मुदत महिनाअखेर संपत आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष कोण? याची चर्चा सुरू झाली असून, नवीन आठ सदस्यपदासाठी कोणाची वर्णी लागते? याकडेही अनेकांचे लक्ष लागून आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेत फेब्रुवारी २०१७ मध्ये सत्तांतर झाले. राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळविली. यात भाजपचे विद्यमान अध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि माजी अध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे शहराचे प्रथम नागरिक महापौरपदी कोण? आणि महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण? याची उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे पहिले दोन महापौर नितीन काळजे व राहुल जाधव हे भोसरी विधानसभा मतदारसंघातील झाले. त्यांचा कार्यकाल प्रत्येकी सव्वा वर्षासाठी निश्‍चित केलेला होता. ते आमदार लांडगे यांचे समर्थक आहेत.

विद्यमान महापौर उषा ढोरे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील असून, आमदार जगताप यांच्या समर्थक आहेत. 

तसेच, स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रथम सीमा सावळे यांची वर्णी लागली. त्यानंतर ममता गायकवाड यांनी सूत्रे सांभाळली. सध्या विलास मडिगेरी अध्यक्ष आहेत. त्यांचा कार्यकाल फेब्रुवारीअखेर संपत आहेत. हे तिन्ही अध्यक्ष आमदार जगताप समर्थक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी अध्यक्ष कोण? याची उत्सुकता वाढली आहे. कारण, भाजप शहराध्यक्षपदाची सूत्रे आमदार लांडगे यांच्याकडे आलेली आहेत. शिवाय, महापौरपदी आमदार जगताप समर्थक नगरसेविकेची वर्णी लागलेली आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांत स्थायी समितीच्या अध्यक्षपदी आमदार लांडगे समर्थकच नगरसेवकाची वर्णी लागेल, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who is the pimpri chinchwad standing committee chairman