संत तुकाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी कोणाच्या हाती दिली सत्तेची चावी

Sant-Tukaram-Sugar-Factory
Sant-Tukaram-Sugar-Factory
Updated on

पौड - श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी माजी खासदार व कारखान्याचे अध्यक्ष विदुरा नवले यांच्याकडेच पुन्हा एकहाती सत्तेची चावी दिली आहे. त्यांच्या गटाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने विजयी झाले.

संत तुकाराम कारखान्याच्या २१ संचालकांच्या निवडणुकीत तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते, उर्वरित अठरा जागांसाठी रविवारी सुमारे ५३ टक्के मतदान झाले. सोमवारी वाकड येथे मतमोजणी झाली. मुळशी तालुक्‍यातील हिंजवडी- ताथवडे गटात बंडखोर उमेदवार पांडुरंग राक्षे यांनी नवले यांच्या पॅनेलला पाठिंबा दिला, त्यामुळे येथे निवडणुकीची औपचारिकता राहिली होती. या गटात नवले यांना ९९७४, बाळासाहेब बावकर यांना ९४२१ आणि तुकाराम विनोदे यांना ९०९० मते मिळाली असून, ७१५ मते बाद झाली. 

पौड- पिरंगुट गटात दिलीप दगडे (९४०१ मते), अंकुश उभे (९४३८ मते) आणि महादेव दुडे (८६७९ मते) हे विजयी झाले. माजी खासदार अशोक मोहोळ यांचे पुत्र संग्राम मोहोळ यांचा पराभव झाला. त्यांना २३३७ मतांवर समाधान मानावे लागले. येथे ५८७ मते बाद झाली.

मावळ तालुक्‍यातील सोमाटणे- पवनानगर गटातून नरेंद्र ठाकर, सुभाष राक्षे, श्‍यामराव राक्षे हे बिनविरोध निवडून आले होते. तालुक्‍यात रंगतदार वाटलेली तळेगाव- वडगाव गटातील निवडणूक एकतर्फी झाली. 

या गटात बापूसाहेब भेगडे (९१९२ मते), ज्ञानेश्वर दाभाडे (९१३१ मते) आणि शिवाजी पवार (९१०९ मते) हे विजयी झाले. त्यांच्या विरोधात मैदानात उतरलेल्या व गेल्या पंचवार्षिकमध्ये नवले विरोधी पॅनेलचे नेतृत्व केलेल्या बाळासाहेब नेवाळे यांना अवघी १४१५ मते पडली. पंढरीनाथ ढोरे (६३३ मते) व तुकाराम नाणेकर (८२४ मते) यांच्यावरही पराभवाची नामुष्की ओढवली.

खेड- शिरूर- हवेली गटातही प्रवीण काळजे, मधुकर भोंडवे, दिनेश मोहिते, अनिल लोखंडे या पॅनेलच्या उमेदवारांच्या विरोधात अरुण लिंभोरे यांनी दिलेली एकाकी लढत सपशेल अपयशी ठरली. या गटात प्रवीण काळजे (९६८७ मते), मधुकर भोंडवे (९५१० मते), दिनेश मोहिते (९२३० मते), अनिल लोखंडे (९०७३ मते) हे विजयी झाले. लिंभोरे यांना फक्त ९२१ मते मिळाली. 

महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी झालेल्या लढतीत नवले पॅनेलच्या ताराबाई सोनवणे (८७७३ मते), शुभांगी गायकवाड (९७८२ मते) या विजयी झाल्या. त्यांनी बंडखोर रूपाली दाभाडे (१४७५ मते) यांचा पराभव केला. येथे ६०८ मते बाद झाली. भटक्‍या विमुक्त जाती व जमातीच्या गटात नवले पॅनेलचे बाळकृष्ण कोळेकर (९८१५ मते) विजयी झाले. त्यांच्या विरुद्ध बंड पुकारलेले सुरेश जाधव यांना केवळ २२५ मते पडली. नवले पॅनेलला पाठिंबा दिलेले शिवाजी कोळेकर यांना ४६१ मते पडली. येथे १०३६ मते बाद झाली. 

इतर मागासवर्ग प्रतिनिधीमध्ये पॅनेलचे चेतन भुजबळ हे ९७४८ मते मिळवून विजयी झाले, त्यांच्या विरुद्धचे अरुण लिंभोरे यांना ११४३ मते मिळाली. या गटात ७१३ मते बाद झाली. अनुसूचित जाती, जमाती गटात बाळू गायकवाड हे ९६३४ मतांनी विजयी झाले. त्यांनी सखाराम गायकवाड (९७२) यांना पराभूत केले. येथे ७०५ मते बाद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com