सीमेवर २० जवान कशासाठी शहीद झाले? याचे उत्तर द्या; आपचा केंद्र सरकारला सवाल!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

- आपचा केंद्र सरकारला सवाल
- सैन्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात आपचे आक्रोश निदर्शन

पुणे : चीनद्वारा आपल्या सैनिकांवर केलेल्या हल्ल्याच्या विरोधामध्ये शनिवारी (ता.२०) आम आदमी पार्टीच्या राज्य युनिटतर्फे राज्यात ठिकठिकाणी आक्रोश निदर्शने करण्यात आली. त्याचाच भाग म्हणून ग्राहक पेठजवळ निदर्शने केली गेली. सीमेवर 20 जवान कशासाठी शहीद झाले? त्याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

- हंगामी शिक्षक म्हणून काम करणाऱ्या प्राध्यापकांना पुणे विद्यापीठाचा दिलासा!

चीनच्या आक्रस्ताळेपणाच्या विरोधात आप केंद्र सरकारच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, अशी ग्वाही आंदोलकांनी दिली. गलवान खोऱ्यामध्ये आपल्या सैन्याच्या 20 जवानांना वीरगती प्राप्त झाली. मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणताहेत की, चीन भारतीय सीमेच्या आतमध्ये घुसला नाही. भारतीय जमिनीवर चीनी सैन्याने कब्जा केला नाही. मग सीमेवर गेले दोन महिने इतका तणाव कशासाठी होता? उच्चस्तरीय चर्चा का होत होत्या? 20 जवान शहीद तर 76 जवान कशासाठी जखमी झाले? का 10 जवानांना बंदी बनवलं गेलं? असे प्रश्न निदर्शकांनी उपस्थित केले. या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

- 'डबल एमपीएससी' उमेदवारांमुळे भंगले अनेकांचे स्वप्न; नेमकं प्रकरण काय आहे?

आपचे शहर अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी सांगितले की, हा एक संवेदनशील मुद्दा आहे. आम्ही शहीद झालेल्या जवानांना बद्दल कुठल्याही पद्धतीचे राजकारण करू इच्छित नाही. आम्ही आपल्या जवानांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. मात्र 20 जवानांनी दिलेल्या बलिदानाला असे व्यर्थ जाऊन देता कामा नये. त्यांच्या बलिदानाचा बदला चीनकडून घेतला पाहिजे. तसेच या वादाच्या पार्श्वभूमीवर चीनकडून कमीत कमी आयात व्हावी यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना शक्य त्या प्रमाणामध्ये राबवल्या जाव्यात, अशी मागणी आहे.

- 'अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय...'; सरकारच्या निर्णयाबाबत विद्यार्थ्यांचं म्हणणं काय?

शहीद झालेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. आपचे मनोज थोरात, आनंद अंकुश, राजेंद्र वराडे, पराग मोरे, संजय चिटणीस, प्रकाश गायकवाड, संदेश दिवेकर, मोहनसिंग रजपूत, सतीश यादव, सुरेश पारखी, अजिंक्य जगदाळे, गणेश वैराट, सुहास पवार, सुनील कांबळे, सैद अली, संदीप सोनवणे आणि अभिजित मोरे यावेळी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why 20 soldiers martyred at the border? Aam Aadmi Party demanded that central government give the answer