बायकोचा फेसबुक फ्रेंड निघाला चोर!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

फिर्यादी यांच्या पत्नीला त्याने साताऱ्यात त्याचा कारखाना, शेती असल्याची बतावणी केली. तो भेटायला येताना चांगल्या गाड्याही वापरत असल्याने तो चोर असेल, असा संशय आला नाही.

पुणे : पत्नीच्या फेसबुक फ्रेंडने बनावट चावीचा वापर करून साडेचौदा लाखांची घरफोडी केल्याचे उघड झाले. या प्रकरणी सराईत चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनीट पाचने अवघ्या 24 तासांत बेड्या ठोकल्या.

निलेश शरद तावरे (वय 29, रा. शहापुरी, सातारा) याला अटक केली आहे. तावरे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत 15 वाहनचोरी, सहा घरफोडी, दोन जबरी चोरी यासह 33 गुन्हे दाखल आहेत. यासंदर्भात 40 वर्षीय व्यक्तीने (रा. बिबवेवाडी) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावरील सोसायटीत राहतात. ते खासगी कंपनीत नोकरी करतात. शुक्रवारी (ता. 6) सकाळी ते नोकरीला गेले. त्यानंतर दुपारी घराला कुलूप लावून ते मुलाला आणण्यासाठी गेले होते. पावणे एकच्या सुमारास परत आल्यानंतर त्यांना घराचे दार उघडे दिसले. घरा कपाटाची तोडफोड झाल्याचे दिसले. चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोकड, असा एकूण 14 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

दाराचे लॅच तोडले नसल्याने बनावट चावीचा वापर केल्याचा संशय गुन्हे शाखेच्या युनीट पाचचे वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांना आला. त्यांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले. तेव्हा एकजण सोसायटीत आल्याचे दिसले. सुरक्षारक्षकांकडे चौकशी केली. तेव्हा आरोपी दोनदा फिर्यादी यांच्याकडे आला होता, असे उघड झाले.

पोलिसांनी फिर्यादी यांच्या पत्नीचे फेसबुक अकाऊंट तपासले. तेव्हा निलेश तावरे हा त्यांचा मित्र असल्याचे दिसले. तावरेच्या काही मित्रांना फोन करून त्याची चौकशी केली. तेव्हा तो साताऱ्यात असल्याचे कळाले. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला साताऱ्यातून ताब्यात घेतले.

रहायला एकदम टकाटक
तावरे याचे रहाणीमान एकदम व्यवस्थित आहे. त्याच्यावर 33 गुन्हे दाखल असले तरी तो तीन वर्षांपासून तो बाहेर आहे. त्यामुळे या काळात त्याने अनेक गुन्हे केल्याची शक्‍यता आहे. दरम्यान, फिर्यादी यांच्या पत्नीला त्याने साताऱ्यात त्याचा कारखाना, शेती असल्याची बतावणी केली. तो भेटायला येताना चांगल्या गाड्याही वापरत असल्याने तो चोर असेल, असा संशय आला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wifes Facebook friend was thief