

फुलांच्या मनमोहक दुनियेची सफर...
फुलांचे जंगली प्रदेश हा मनात दडलेल्या जिप्सीमुळे भटकंतीची अतीव आवड असलेल्या ॲड. सीमंतिनी नूलकर या लेखिकेचा हा अत्यंत देखणा ललितलेख संग्रह. पश्चिम घाट ते हिमालयातल्या वेगवेगळ्या जंगली प्रदेशांत वेगवेगळ्या ऋतूंमध्ये केलेल्या भटकंतीमध्ये ‘सोसलेल्या’ पुष्पबहरात वाचकालाही न्हाऊ घालणारा.
सह्याद्रीच्या सड्यांवर उमलणाऱ्या चिमुकल्या गवतफुलांपासून ते देववृक्ष कदंबापर्यंत कितीतरी फुलं, झाडं इथे वाचकाला भेटतात. त्यांचं जीवशास्त्र ते जीवनशास्त्र असा चतुरस्र पट लेखिका मांडते. त्यांचे भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भ सांगते. त्या फुलांबद्दल, वृक्षांबद्दल प्रचलित असलेल्या पुराणकथा, मिथके, लोककथा, लोकगीते, लोकपरंपरा यांबरोबरच त्यांच्याशी निगडित बंदिशी, आधुनिक कविता यांचेही संदर्भ उलगडते. भारतातील वैशिष्ट्यपूर्ण ऋतुचक्र आणि त्यामुळे सृष्टीत होत राहणाऱ्या बदलांची शब्दचित्रे हे या लेखांचे अजून एक वैशिष्ट्य.
देवतांचं वास्तव्यस्थान म्हणून मिरवणारा कदंब, दर बारा वर्षांनी फुलणारी केरळमधील नीलकुरिंजी, भावनांचा कल्लोळ प्रक्षेपित करणारी ऑर्किड, कुठेही सहजपणे पण मानाने जगणारी बाभूळ, दळदार पाकळ्यांचे किमयागार किंजळ, आरक्त, म्लान, अंतर्मुख सावर असं प्रत्येक फुलाचं वैशिष्ट्य मोजक्या शब्दांत मांडते. अंजन, कांचन, करवंद, वड, पिंपळ अशोक, जारूल अशा वृक्षांची रंजक माहिती लेखिका देते. परदेशांमधून भारतात आलेल्या आणि आता इथल्याच झालेल्या गुलमोहोरासारख्या जक्रांदाला नीलमोहोर म्हणतातच; पण यक्षरात्री असं खास संस्कृत नाव त्याला मिळालं आहे, तर बहाव्याला अमलताश; पण बंगालीमधे त्याला शोनाली म्हणतात! या सगळ्या फुलांचे शिवपार्वती या आदिम दैवतांबरोबरच वेगवेगळ्या संस्कृतींत विष्णू, कृष्ण, गणपती, कार्तिकेय अशा वेगवेगळ्या दैवतांशी जोडले जाणे आणि त्या निमित्ताने त्या वनस्पतींचे संवर्धन होणे यांची सांगड कशी घातली जाते ते संदर्भ महत्त्वाचे आहेत.
या सगळ्यातून लेखिका महत्त्वाची निरीक्षणे मांडते. वनस्पती, फुलं फार समंजस असतात. जन्माला आलोय, फुलायचंच आहे तर स्पर्धा कशाला? किंवा झाडांचं स्वतःचं असं एक खासगी आयुष्य असतं यासारखी सत्यं ती सहजपणे लिहून जाते. रान स्नान करत पंचेंद्रियांनी निसर्गाचा अनुभव घेऊन त्याविषयी मनातलं हितगूज सांगणारी लेखिका आदिवासी कन्यांनी दिलेले मोतिया गेंदांची काकणं आणि गळेसर घालून मिरवते. लेखिकेला पडलेली निळाईची भूल तिच्या लेखांतून जाणवत राहते. हा ललितलेख संग्रह काव्यमय भाषेत संस्कृती आणि मानवी जीवन यांच्यातले वैश्विक आणि एतद्देशीय दुवे रंजकतेने वाचकांसमोर मांडतो. निसर्गाकडे नव्या नजरेने पाहायला शिकवतो. पुस्तकाच्या शेवटी छापलेली काही फुलांची रंगीत छायाचित्रे सुंदर आहेत. वाचकाला फुलांच्या मनमोहक दुनियेची सफर घडवून आणण्यात लेखिका खचितच यशस्वी झाली आहे. या पुस्तकाला अनेकविध पुरस्कार लाभले आहेत. साताऱ्यात डॉ. राजेंद्र माने, रवींद्र झुटिंग यांचा अनेक सांस्कृतिक- साहित्यिक उपक्रमात पुढाकार असतो. त्यांच्याच पुढाकारातून भास्करराव माने स्मृती पुरस्कार दर वर्षी देण्यात येतात. यावर्षी हा पुरस्कार फुलांचे जंगली प्रदेश या पुस्तकाला आज मिळतो आहे. याबद्दल लेखिका ॲड. सीमंतिनी यांचे विशेष अभिनंदन.
- डॉ. मेधा क्षीरसागर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.