अजितदादा आज बैठकांच्या धडाक्‍यातून पुणेकरांना दिलासा देणार?

मंगेश कोळपकर
Friday, 12 June 2020

राज्यात मुंबई खालोखाल पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे प्रशासकीय आढावा घेतानाच पालकमंत्री म्हणून ते बसचालक, रिक्षा, सलून, पथारी आदी व्यावसायिकांना दिलासा देणार का, या बद्दलही उत्सुकता आहे.

पुणे : धडाक्‍याने काम करणारे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या पुणे दौऱ्यातून ते पुणेकरांना दिलासा कसा देणार, याकडे लक्ष लागले आहे. राज्यात मुंबई खालोखाल पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे प्रशासकीय आढावा घेतानाच पालकमंत्री म्हणून ते बसचालक, रिक्षा, सलून, पथारी आदी व्यावसायिकांना दिलासा देणार का, या बद्दलही उत्सुकता आहे.

शेतकऱ्याच्या पोरोची गरुड भरारी

मुंबईनंतर कोरोनाचा उद्रेक पुण्यात झाला आहे. शहर, जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दहा हजारपेक्षा जास्त झाली आहे. आता अजित पवार हे मुंबईतून राज्यभर लक्ष देत असले, तरी त्यांचे पुण्यावर विशेष लक्ष असते, हे नेहमीच दिसून येते. अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या असो अथवा बदल्या, त्यांचा त्यावर कटाक्ष असतोच. तसेच काही नियुक्‍त्यांबाबत ते आग्रही असतातच. ते शुक्रवारी पुण्यात चार बैठकांना उपस्थित राहणार आहेत. त्यातील एक बैठक पोलिसांबरोबर असून, उर्वरित तीन बैठका प्रशासनाबरोबर आहेत.

बारामतीच्या नवीन वाहतूक आराखड्याला हिरवा कंदिल

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे केंद्रीय पथक नुकतेच पुण्यात येऊन गेले आहे. पुणे महापालिकेत आयुक्त म्हणून चार वर्षे काम केलेले कुणाल कुमार या पथकाचे प्रमुख होते. पुण्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर अजित पवार याबाबत कोणते आदेश देतात, याकडेही लक्ष आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चारच दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तालयाला भेट देऊन माहिती घेतली होती. अजित पवार यांनीही पुन्हा पोलिसांची भेट घेण्याचे ठरविल्यामुळे पोलिस वर्तुळातही आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पाठ्यपुस्तके पाहून हरखली बालमने

लॉकडाउनमध्ये पुण्यात शिथिलता देण्यात आली असली, तरी सलून व्यावसायिकांना अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे नाभिक संघटनेने राज्यभर आंदोलन गेल्या दोन दिवसांपासून सुरू केले आहे. पुण्यात पथारी व्यावसायिकांनाही अद्याप व्यवसायाची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे हा कष्टकरी वर्ग सध्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच पुणे व्यापारी महासंघाने पवार यांची गेल्या आठवड्यात भेट घेऊन मध्यभागातील दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. परंतु, पोलिस आणि महापालिका प्रशासनाने याबाबत 15 जूननंतर निर्णय घेण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे महासंघाचेही पदाधिकारी नाराज आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहरात रिक्षाला अद्याप बंदी आहे. मात्र, उपसमार होऊ लागल्याने रिक्षाचालक बेकायदेशीरपणे वाहतूक करू लागले आहे. त्यामुळे प्रशासकीय आढावा घेताना पवार पुणेकरांना दिलासा देण्यासाठी कोणती पावले उचलणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Ajit Pawar relieve the people of Pune from today's meeting?