Pune कोणी फुकटात दारु देईल का दारु ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : कोणी फुकटात दारु देईल का दारु ?

पुणे : तुम्हाला दुकानदाराकडून किराणा, कपडे, चप्पल,बुट अशा वस्तु उधारीवर मिळू शकतात, किंवा दुकानदारही ग्राहक टिकविण्यासाठी उधारीचा व्यवसाय करतात. अन्य छोट्या, मोठ्या विक्रेत्यांबरोबरच सर्वसामान्य ग्राहकांकडूनही उधारीला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते.

पण कोणी दारु उधारीवर मागेल का ? बरं उधारीवर दारु द्यायची झाली, तरी मद्यपीवर विश्‍वास ठेवणार कोण ? आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यातरी कुठे लक्षात राहणार, हा प्रश्‍न वेगळाच ! पण सिंहगड रोड परिसरात मद्यपींनी हॉटेलच्या मालकाकडे उधारीवर दारु मागितली, मात्र मालकाने त्यांना नकार दिला, पुढे चिडलेल्या मद्यपींनी थेट मालकालाच कोयत्याने मारहाण केली !

तर, घडलेला प्रकार असा. गुरुण्णा शिवण्णा तावरखेड (वय 40, रा. नऱ्हे) यांचे नऱ्हे भागात रॅस्टॉरंट व बार आहे. नेहमीप्रमाणे त्यांचे शुक्रवारी रोजी त्यांचे रेस्टॉरंट सुरु होते. त्यावेळी सराईत गुन्हेगार श्रीकांत थोपटे (वय 35) हा त्याच्या पाच ते सहा साथीदारांसमवेत तेथे आला.

त्यांनी फिर्यादी तावरखेड यांच्याकडे उधारीवर दारु मागितली. तेव्हा, त्यांनी उधारीवर दारु देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या संशयित आरोपी थोपटे याने तावरखेड यांच्या डोक्‍यात कोयता मारला. केवळ तेवढ्यावरच न थांबता आरोपींनी रेस्टॉरंटमध्ये दहशत माजवून ग्राहकांना शिवीगाळ केले.

तसेच नऱ्हे परिसरातील दुकानदारांनाही धमकावून दुकाने बंद करण्यास सांगितले. या घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाले. दरम्यान, याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात थोपटे व त्याच्या पाच ते सहा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.