esakal | हिशोब लावून फिरत्या हौदाचे बिल देणार - हेमंत रासने
sakal

बोलून बातमी शोधा

hemant-rasne

हिशोब लावून फिरत्या हौदाचे बिल देणार - हेमंत रासने

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : गणेश विसर्जनासाठी ६० फिरते हौद पुरविण्याच्या सव्वा कोटी रुपयांच्या कामाला आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मात्र, ठेकेदाराचे बिल काढताना जेवढे काम केले आहे तेवढेच बिल दिले जाईल. ज्या गाड्या विसर्जनासाठी बाहेर पडल्या नाहीत त्यांचे बिल दिले जाणार नाही. पुढील दिवस या गाड्या कुठे कुठे फिरल्या यावर लक्ष ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत, असे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना घनकचरा विभागाने गडबडीत ‘११ दिवसांसाठी फिरते विसर्जन हौदासाठी सव्वा कोटीची निविदा काढली ची निविदा काढली. मात्र, दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन होत असताना ६० पैकी निम्म्याच गाड्या बाहेर पडल्याच नाहीत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. ११ दिवसांची निविदा काढल्याने निधीची उधळपट्टी होत असल्याची टीका सामाजिक संस्थांनी केली आहे.

'सकाळ'ने हा विषय समोर आणला होता. हा विषय आज (मंगळवारी) स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी आल्यानंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर स्थायी सदस्या नगरसेविका नंदा लोणकर यांनी प्रश्‍न उपस्थित केले. कोट्यावधी रुपये खर्च करूनही नागरिकांना हौदाची सुविधा मिळाली नाही, विसर्जन नसताना त्या दिवशीचे पैसे का द्यायचे असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर प्रशासनाने चार दिवसांसाठी निविदेला प्रतिसाद दिला नसता त्यामुळे ११ दिवसांसाठी निविदा काढली असा खुलासा केला. तर गणेशोत्सवाचा विषय असल्याने त्यास विरोध करू नका असे सत्ताधाऱ्यांकडून लोणकर यांना सांगण्यात आले. त्यामुळे हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

‘‘निविदा काढून फिरते हौद पुरविण्याचे काम देण्यात आले आहे. गणेशोत्सवात ६ दिवस विसर्जन असतात. ज्या दिवशी ठेकेदाराने काम केले आहे त्याच दिवसाचे पैसे दिले जातील. पुणेकरांच्या पैशाचा अपव्यय होऊ देणार नाही. या कामाचा प्रशासनाकडून अहवाल मागविला जाणार आहे.’’

-हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती

"गेल्यावर्षी संचारबंदी होती, त्यामुळे फिरत्या हौदाची सोय करणे योग्य होते, पण आता सर्वकाही खुले असताना घाट व हौद बंद करून ११ दिवसांसाठी फिरते हौदाचे काम काढणे म्हणजे ठेकेदाराचेच भले केले जात आहे. त्यामुळे यात अधिकाऱ्यांचे निलंबन करून आयुक्तांनी चौकशी केली पाहिजे.’’

-विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

‘‘फिरत्या हौदांसाठी सव्वा कोटी रुपयांची निविदा काढणे म्हणजे पुणेकरांची फसवणूक आहे. आम्ही आमच्या मूर्तीच्या विसर्जनाची जबाबदारी घेतो.पण या कामाच्या नावाखाली खाबूगिरी करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा.’’

-जयराज लांडगे, उपशहराध्यक्ष, मनसे

loading image
go to top