
MPSC Protest : तिसऱ्या दिवशीही MPSC चे विद्यार्थी आंदोलनावर ठाम; जोपर्यंत...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५ पासून करावी या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे बालगंधर्व चौकात आंदोलन सुरू असताना आज रात्री अकराच्या सुमारास अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी भेट घेतली.
जोपर्यंत लेखी आदेश निघत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. दरम्यान, काल रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यानंतर आंदोलन स्थळावरुनच शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी विद्यार्थ्यांच्या मागण्याबाबत फोनवरुन संवाद देखील साधला होता. मात्र, त्यानंतरही विद्यार्थ्यी आंदोलनावर ठाम आहेत.
आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. आमच्या मागणीची अधिकृत नोटीस काढल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी यावेळी माडंली आहे. आम्ही जेव्हा जेव्हा आंदोलन केलं तेव्हा तेव्हा आम्हाला फक्त आश्वासन दिलं गेलं. पण अधिकृत नोटीस निघाली नसल्याचं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री दोन-दोन तीन-तीन दिवस पुण्यात राहतात. मात्र, आंदोलक विद्यार्थ्यांना भेटत नसल्याची खंत विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
तर गेल्या दोन दिवसापासून विद्यार्थ्याचं हे आंदोलन सुरुच आहे. आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान, रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आंदोलनस्थळी गेले होते. त्यांनी फोनवरुन एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. सध्या विद्यार्थी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. जोपर्यंत लेखी आंदेश निघत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
या प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि येत्या दोन दिवसात यासंबंधी एक बैठक घेण्याचं आश्वासन त्यांनी दिल्याचे शरद पवार म्हणाले. विद्यार्थ्यांची बाजू मांडण्यासाठी एका शिष्टमंडळाने आपल्यासोबत यावं असंही शरद पवारांनी सांगितलं आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत एमपीएससीचे अध्यक्ष आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित असतील, त्यामुळं तुमची बाजू मांडणं आवश्यक आहे असंही शरद पवार म्हणाले आहेत.