esakal | आरती गायनातून विश्वमांगल्याची कामना
sakal

बोलून बातमी शोधा

pune

आरती गायनातून विश्वमांगल्याची कामना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : गणेशोत्सवात पूजन प्रसंगी घरोघरी पारंपरिक स्तोत्र, प्रार्थना, आरती गाऊन विश्वमांगल्याची कामना केली जाते. पुण्यातील शास्त्रीय गायिका कविता खरवंडीकर यांनी गणपतीसंबंधी संस्कृत स्तोत्र, हिंदी व मराठीतील आरती तसंच प्रार्थनागायन अनेक वर्षे लोकांसमोर केलं आहे. गणेशस्तुतीपर काही रचना त्यांच्या स्वरांत ध्वनिफितीतून रसिक ऐकतात.

खरवंडीकर म्हणाल्या, ‘‘आदि शंकराचार्यांनी रचलेलं ‘महागणेशपंचरत्नस्तोत्रम्’ मी गाते. संस्कृत भाषेतील या स्तोत्रात गणपतीच्या सगुण व निर्गुण वर्णनांचा अलौकिक संगम साधलेला जाणवतो. ते म्हणतात,

‘मुदा करात्त मोदकम् सदा विमुक्तिसाधकम्

कलाधरावतंसकं विलासिवलोकरक्षकम्'' ।

अनायकैकनायकम् विनाशितेभदैत्यकम्

नताशुभाशुनाशकम् नमामि तं विनायकम् ।। १।।

आनंदाने मोदक हाती घेतलेला, कपाळी चंद्रकोर धारण केलेला, एकदंत, गणांमध्ये श्रेष्ठ, हत्तीचं मुख असलेल्या हे लंबोदरा; तुला वंदन असो. तू सूक्ष्मातिसूक्ष्म आहेस. योगिजनांच्या अंतःकरणात सद्रूपाने राहतोस. असंच श्रीव्यास रचित ‘नारदपुराणा’त ‘संकटनाशनगणेशस्तोत्रम्’ देखील आगळंवेगळं आहे.

यात गजाननाची गौरीपुत्र, विनायक, वक्रतुंड, एकदंत, लंबोदर आदी नावं आली आहेत. या स्तोत्राच्या पठणाने संकटं टाळतात, अशी लोकभावना असल्याने अनेकजण भक्तिभावाने याचं पठण करतात. अनुष्टुभ छंदातील हे स्तोत्र, ‘आता विघ्नं संपतील. नवीन संकट येणार नाहीत,’ अशी काहीशी सकारात्मकता देऊन जातं. अथर्व वेदातील परिशिष्टात गणकऋषीकृत ‘गणपत्यथर्वशीर्षम्’ समाविष्ट आहे. थर्व म्हणजे कंप पावणं. याच्या उलट शब्द आहे स्थिरता. शाश्वत शांतता, स्थैर्य व अखंड शक्ती आदींचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या गणेशाचं गुणगान यात आहे.’’

हेही वाचा: Ganeshotsav 2021 : गणराज रंगी नाचतो

खरवंडीकर यांनी असंही सांगितलं की, माझ्या माहेरी दीडच दिवस गणपती बाप्पा असायचा. इतक्या कमी काळात त्या मंगलमूर्तीचं विसर्जन नकोसं वाटायचं. सासरी दहा दिवसांच्या उत्सवामुळे ती राहून गेलेली इच्छा पूर्ण होत असते. माझे सासरे पंडित देवीप्रसाद खरवंडीकर हे संस्कृत भाषेतील तज्ज्ञ असून त्यांनी अनेक सांगीतिक रचनाही केल्या आहेत. त्यांपैकी ‘गजाननाष्टकम्’ मी गात असते. स्तवनांचं गायन अनेकदा देवस्थानांच्या प्रांगणात करण्याची संधी मला मिळाली आहे.

हिंदीतील ‘सेंदूर लाल चढायो,’ ही आरती गाताना गणपतीची मूर्ती डोळ्यांसमोर येऊ लागते, इतकं उत्कटतेनं दृश्यरूप वर्णन तिच्यात केलेलं आहे. ‘सुखकर्ता-दुःखहर्ता,’ ही आरती पारंपरिक चालीवर घरोघरी गायली जाते. ती गाताना किंवा ऐकताना मला श्रीगजाननाची माया जाणवते.

- कविता खरवंडीकर, गायिका

loading image
go to top