esakal | Ganeshotsav 2021 : गणराज रंगी नाचतो
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2021 : गणराज रंगी नाचतो

Ganeshotsav 2021 : गणराज रंगी नाचतो

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-डॉ. आर्या जोशी संशोधक, ज्ञानप्रबोधिनी

कला आणि विद्यांचा अधिष्ठाता असलेला गणेश एक उत्तम नर्तकही आहे बरं का! आपलं लंबोदर आणि तुंदिलतनु रूप सांभाळूनही तो स्वतःच्या नृत्यकलेतील प्रावीण्य जोपासतो आहे.

नटराज शिवाचा पुत्र अशी त्याची पुराणग्रंथातली ओळख आहेच. त्यामुळे कधी तो आपल्या पित्याच्या नृत्यात त्यांना वाद्याची साथ करताना दिसतो तर कधी स्वतः नृत्यात मग्न होतो. कर्नाटकातील बदामीच्या प्रसिद्ध लेण्यांमध्ये नृत्यात मग्न शिव आणि त्याच्यापुढे वाद्य हाती घेतलेला गणपती आपल्याला दर्शन देतात.

ब्रह्म पुराणातील आख्यायिकेनुसार गणेशाने शंकर आणि पार्वती यांच्यासमोर नृत्य करून त्यांना प्रसन्न केले आणि त्यामुळेच शंकरांनी त्याला कौतुकाने स्वतःच्या डोक्यावरील चंद्र बहाल केला.

शिल्पशास्त्रातही नृत्यगणेशाची विविध रूपं आपल्याला अनुभवायला मिळतात. नृत्य करताना कधी तो आपल्या हातात सर्पही धरतो. भारतातील प्राचीन मंदिरांवर कोरलेल्या वैविध्यपूर्ण मूर्तींमध्ये नृत्य गणेशही पहायला मिळतो. चिन्नकेशव मंदिराचे प्राचीन स्थापत्य असो वा फिलाडेल्फिया संग्रहालयातील नृत्यगणेशाची मूर्ती. या मूर्ती देवतेचा पदन्यास दाखवतात.

समर्थ रामदासांनी दासबोधात नृत्यगणेशाचे सुरेख वर्णन केलेले आहे. पहिल्या दशकाच्या दुसऱ्या समासात समर्थ म्हणतात..

सगुण रूपाची टेव । माहा लावण्य लाघव ।

नृत्य करितां सकळ देव । तटस्त होती ॥ ८॥

चौदा विद्यांचा गोसांवी । हरस्व लोचन ते हिलावी ।

लवलवित फडकावी । फडै फडै कर्णथापा ॥ १३॥

नट नाट्य कळा कुंसरी । नाना छंदें नृत्य करी ।

टाळ मृदांग भरोवरी । उपांग हुंकारे ॥ २१॥

स्थिरता नाहीं येक क्षण । चपळविशईं अग्रगण ।

साजिरी मूर्ति सुलक्षण । लावण्यखाणी ॥ २२॥

रुणझुणा वाजती नेपुरें । वांकी बोभाटती गजरें ।

घागरियासहित मनोहरें । पाउलें दोनी ॥ २३॥

ईश्वरसभेसी आली शोभा । दिव्यांबरांची फांकली प्रभा ।

साहित्यविशईं सुल्लभा । अष्टनायका होती ॥ २४॥

ऐसा सर्वांगे सुंदरु । सकळ विद्यांचा आगरु ।

त्यासी माझा नमस्कारु । साष्टांग भावें ॥ २५॥

अत्यंत नटून सजून, चपळाईने तरीही लालित्यपूर्ण नृत्य करणारा गणेश हा सर्व कलाकारांचा आदर्शच आहे. सर्वांना आपल्या कौशल्याने मोहित करून कलेची निष्ठेने आराधना करण्याचा गुण शिकविणारा हा नृत्यगणेश सर्व कलासक्त मनांना प्रेरणा देत राहो.

loading image
go to top