esakal | गणेशोत्सव मंडळांच्या पत्रिका कार्यक्रमांविनाच
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सव मंडळांच्या पत्रिका कार्यक्रमांविनाच

गणेशोत्सव मंडळांच्या पत्रिका कार्यक्रमांविनाच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: कोरोनाच्या प्रभावामुळे गेल्या दीड वर्षापूर्वी कलाक्षेत्राला लावलेले कुलूप अद्यापही खोलण्यात आलेले नाही. किमान यंदातरी कलाक्षेत्राचे नियम शिथिल करून येत्या गणेशोत्सवात कलाकारांना लाइव्ह (प्रत्यक्ष) कार्यक्रम करायला परवानगी देण्याची मागणी सांस्कृतिक पंढरी असणाऱ्या पुण्यातील कलाकारांतून होत आहे.

हेही वाचा: पुणे: गटशिक्षणाधिकाऱ्यासह दोघांना ५० हजारांची लाच घेताना अटक

गणेशोत्सव साजरे करणाऱ्या मंडळांच्या कार्यक्रमपत्रिका कलागुणांच्या कार्यक्रमांनी भरलेल्या असतात. मात्र यंदाही या पत्रिका कार्यक्रमांविना रिकाम्या राहणार अशीच चिन्हे आहेत. गणेशोत्सव काळातील सगळे दिवस कलाकारांच्या तारखा बुक असतात. गणेशोत्सव काळातच कलाकारांना मानधनातून अर्थप्राप्ती होत असते, तसेच वर्षभर विविध ठिकाणच्या कार्यक्रमांच्या तारखा ठरत असतात.

गणेशोत्सवानंतर येणारे विविध सण, उत्सव कलाकारांच्या कार्यक्रमांसाठी महत्त्वपूर्ण असतात. मात्र सर्व सणांवर आणलेले निर्बंध, तसेच मंदिरे बंद असल्यानेही साजरे होणारे उत्सव बंद असल्याने कलाकारांचे विश्व सुनेसुने झाले आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरीही अद्याप शासन पातळीवर कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही.

हेही वाचा: पुणे : मिळकत वाटप नियमावलीत होणार सुधारणा

नाट्यगृहे बंद आहेत. कलाक्षेत्रावरील हे निर्बंध किती दिवस असेच कायम ठेवणार कलाकारांचे, त्यावर अवलंबून असणाऱ्या साउंड, लाइट, मंडप, बॅकस्टेज कलाकार आदी इतर घटकांना किती दिवस खितपत ठेवणार, असा सवाल आता कलाकारांतून विचारला जात आहे.

‘प्रारंभ’चुकण्याची भीती

कलाकार हा रसिकांकडून मिळणाऱ्या थेट प्रतिक्रियेचा भुकेलेला असतो, तेच त्याचे ऊर्जास्थान असते. अर्थप्राप्ती व रसिकांकडून मिळणाऱ्या दादला कलाकार सध्या मुकला आहे. गणेशोत्सवापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ होतो. मात्र यंदाही हा प्रारंभ चुकण्याची भीती कलाकारांना सतावत आहे.

कोरोनाच्या काळात जिथे सगळ्याच क्षेत्रांचे काम सुरू झाले आहे, तिथे कलाक्षेत्रालाही शासनाने निश्चित परवानगी द्यावी. गेल्या २ वर्षांत कलाकारांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता कलाक्षेत्रातील काम लवकरच सुरू व्हावे. अर्थात, संपूर्ण नियम पाळणे ही कलाकारांची व रसिकांची जबाबदारी असली पाहिजे.- चित्रा देशपांडे, बालकलाकार ‘आकार’ संस्था संचालक

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ  रसिकांसमोर कार्यक्रम सादर करता आलेले नाहीत. आर्थिक चणचण, कौटुंबिक विवंचनेमुळे कलाकारांमध्ये नैराश्य आले आहे. हे नैराश्य लवकरात लवकर दूर सारण्यासाठी गणेशोत्सवापासून गायन, वादन, नृत्य असे कार्यक्रम सुरू होणे अत्यावश्यक आहे. यासाठी शासनाने कोरोनाविषयक नियमांचे पालन करून कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी.- रेवती सुपेकर, गायिका

कोरोनामुळे सर्व कलाजगत दीड वर्ष बंद असल्याने कलाकार व त्यांच्याशी निगडित अनेक क्षेत्रे आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे या वर्षी तरी शासनाने गणेशोत्सवापासून कार्यक्रमांना परवानगी घ्यावी. आयोजक, रसिक आणि कलाकार सर्वांनीच काळजी घेऊन गणेशोत्सव साजरा करायला हरकत नाही.- माधुरी कासट, गायिका

loading image
go to top