
Pune News: पारगाव ते लोणी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार; एक जखमी
पारगाव : जारकरवाडी ता.आंबेगाव गावाच्या हद्दीत पारगाव लोणी रस्त्यावर बढेकरमळा (पाटीलवस्ती) येथे अज्ञात वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वंदना धोंडीभाऊ लबडे ( वय 40 वर्षे ) रा. जारकरवाडी यांना धडक दिल्याने मृत्यू झाला आहे. तर याच रस्त्यावर दुसऱ्या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला.(Pune News)
पारगाव कारखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पारगाव लोणी रस्त्यावर धामणी बाजुकडुन पारगाव बाजुकडे चाललेल्या अज्ञात वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वंदना धोंडीभाऊ लबडे यांना धडक मारल्याने त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर कुठलीही मदत न करता व खबर न देता वाहन चालक वाहन घेऊन तेथुन पळुन गेला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक लहूजी थाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले धडक दिलेल्या वाहनाचा क्रमांक मिळाला असून त्या वाहनाचा शोध घेऊन वाहन चालकाला लवकरच अटक केली जाईल असे सांगितले.
याच रस्त्यावर याच परिसरात काल मंगळवारी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास शांताराम बाळासाहेब जाधव (रा. धामणी) हे भीमाशंकर कारखाना (पारगाव ) येथून रात्रपाळीच्या कामावरून सुटल्यानंतर मोटारसायकल वरून धामणी येथील घरी जात असताना बढेकरमळा येथे मोटारसायकल घसरून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकून झालेल्या अपघातात शांताराम जाधव यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
भीमाशंकर साखर कारखान्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे या रस्त्याचे नुकतेच काम झाल्यामुळे या रस्त्यावरून जाणारी वाहने वेगात जात आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या परिसरात रस्त्यावर गतिरोधक बसवावा अशी मागणी सामाजिक कार्येकर्ते भगवान बढेकर यांनी केली आहे.