अजित पवार यांची बदनामी करणारी महिला म्हणते, माझा मोबाईल हरवलाय

भरत पचंगे
Thursday, 23 July 2020

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांच्याविषयी सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह टिपण्णी व बदनामी केल्याप्रकरणी संगीता वाणखेडे यांना शिरूर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

शिक्रापूर (पुणे) : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांच्याविषयी सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह टिपण्णी व बदनामी केल्याप्रकरणी संगीता वाणखेडे यांना शिरूर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, त्यांची रवानगी बुलढाणा तुरुंगात केली असून, त्यासाठी शिक्रापूरचे पोलिस पथक नुकतेच त्यांना घेऊन बुलढाण्याला रवाना झाले आहे. तसेच, मोबाईल हरवला असल्याची माहिती या महिलेने पोलिसांनी दिली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली. 

नापास विद्यार्थ्यांसाठी खूशखबर, पास होण्याची संधी आलीये चालून...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत एक बैठक मुंबईत पार पडली. त्यानंतर संगीता वाणखेडे यांनी एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला. त्यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्वप्नील गायकवाड (रा. कोंढापुरी, ता. शिरूर) यांच्या तक्रारीनुसार १८ जुलै रोजी चाकण (ता. खेड) येथील संगीता वाणखेडे यांच्या विरुध्द बदनामी, शिवीगाळ, असभ्य भाषा व आयटीअ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच दरम्यान वाणखेडे यांच्यावर अशाच प्रकारचे पाच पोलिस स्टेशनला गुन्हे बुलढाणा जिल्ह्यातील पोलिसांकडे दाखल होता. त्यामुळे त्यांना बुलढाणा पोलिसांनी आधीच अटक केली होती. वाणखेडे यांना बुलढाण्याहून दोन दिवसांपूर्वी शिक्रापूर पोलिसांनी तपासकामी शिक्रापूरला आणून त्यांना शिरुर न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी शिरुर न्यायालयाने त्यांना आजपर्यंत (ता. २३) पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना आज शिरुर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सोशल मिडीयावरून केलेल्या बदनामीप्रकरणी संगीता वाणखेडे यांचा तपास करताना पोलिसांना त्यांचा मोबाईल हवा होता. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इतर माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी वाणखेडे यांच्याकडून तपासादरम्यान मोबाईलची मागणी केली. मात्र, मोबाईल हरवल्याचे त्यांनी सांगितल्याचे शेलार यांनी सांगितले. दरम्यान, मोबाईलचा डम्पडाटा, कॉल डिटेल्स, डिलिटेड आणि अपलोडेड डाटा हा मिळविणे पोलिसांसाठी अवघड नाही. मात्र, वाणखेडे यांचा मोबाईलच हरविल्याने आता पोलिसांना वरील सर्व सोपस्कर पुन्हा न्यायालयाच्या परवानगीने करावे लागणार, हे नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A woman who defamed Ajit Pawar has been remanded in judicial custody