esakal | बचत गटातील महिलांची फसवणूक; एकाला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

arrested

बचत गटातील महिलांची फसवणूक; एकाला अटक

sakal_logo
By
दत्ता म्हसकर

जुन्नर : बचत गटातील महिलांची फसवणूक करणाऱ्या जनसेवा लघु उद्योग विकास महाराष्ट्र या संस्थेच्या किशोर वशिष्ठ काळे या आरोपीस मोबाईल लोकेशनद्वारे जुन्नर पोलिसांनी (junnar police) शिताफीने पकडले. जुन्नर न्यायालयाने (junnar court) त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. याबाबत सुरेखा महेंद्र मडके रा. तांबे ता.जुन्नर यांनी त्यांच्या गावातील दोन बचत गटातील महिलांची फसवणूक केली असल्याची तक्रार दिली होती.(women bachat gat cheating one arrest)

तालुक्यातील अंजनावळे, सोमतवाडी, तांबे, आंबे, हातवीज, माणिकडोह या गावातील बचत गटाच्या महिलांची आरोपी व त्याचे दोन पुरुष व दोन महिला साथीदारांनी फसवणूक केल्याच्या तक्रारी आहेत. बचत गटातील महिलांना हळद, मिरची पावडर, जिरे, मोहरी, वगैरे वस्तूंची अर्धा अर्धा किलो पॅकिंग करून द्यायची आहे. कच्चा माल व पिशव्या आम्ही देणार, असे सांगुन कंपनीत नोंदणी करण्यासाठी प्रत्येकी तीनशे रुपये तांबे तसेच अंजनावळे आदी गावातून महिलांची फसवणुक केली असल्याच्या तक्रारीवरून जुन्नर पोलिसांनी ही कारवाई केली.

जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी अंजनावळे येथील बचत गटातील महिलांसह जुन्नर पोलीस ठाण्यात येऊन आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती. मोबाईल लोकेशन नुसार आरोपीला बीड येथून आणण्यासाठी पोलिसांना गाडी दिली होती. जुन्नरचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, पोलीस हवालदार मनीषा ताम्हाणे, अमोल शिंदे, भरत सूर्यवंशी यांनी बीड येथून आरोपीस पकडून आणले. अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

तसेच, जुन्नर परिसरात अशाप्रकारे फसवेगिरीचे प्रकार घडले असतील जुन्नर पोलिसांशी खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रभारी अधिकारी विकास जाधव यांनी केले आहे.

संपर्क साधण्यासाठी क्रमांक -

02132222033/ 8329700136/ 9967913607

loading image