Kasba Bypoll Election : मतदानासाठी 'ती' लंडनहून थेट पुण्यात! म्हणाली, "घरात बसून..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasba Bypoll Election

Kasba Bypoll Election : मतदानासाठी 'ती' लंडनहून थेट पुण्यात! म्हणाली, "घरात बसून..."

पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू आहे. कसबा आणि चिंचवडच्या जागा भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झाल्या आहेत. दरम्यान मतदान टक्केवारी कमी असल्याची चर्चा आहे. मात्र आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक तरूणी थेट लंडनहून पुण्यात आली आहे. 

या तरूणीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मतदान हा आपला अधिकार आणि हक्क आहे. सगळ्यांनी मतदान केले पाहिजे, अशी भूमिका पुढे घेऊन जात अमृता देवकर ही तरुणी थेट लंडनहून आज पुण्यात पोहचली. 

तब्बल १२ तासाहून अधिक प्रवास करून आलेल्या अमृता यांनी पुण्यात येताच थेट मतदान केंद्र गाठलं आणि मतदानाचा हक्क बजावला. अमृता म्हणाली, मी रात्री दिड वाजता मुंबईत पोहचले. ३ वाजता मुंबईतून पुण्यासाठी निघाले. ८ पर्यंत पुण्यात पोहचले त्यानंतर थोडा ब्रेक घेऊन मतदान करण्यासाठी आले. मतदानाचा हक्क सोडायचा नव्हता. पहिली भावना होती की मतदाना हक्क बजावायचा आहे. 

कसब्यात पाण्याचे प्रश्न होते. आता ते सुटत आहेत. मात्र अजूनही नागरीकांचे काही प्रश्न आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी ते सोडवण्याचे प्रयत्न करावे. कसब्यात विकास होत आहे. पण तो विकास आणखी वेगाने व्हायला हवा, असे अमृता देवकर म्हणाल्या. 

घरात बसून अडचणी सुटत नसतात -

घरच्यांची भावना होती की मी पुण्यात येत आहे तर मतदानाचा हक्क नक्की बजावावा. ४ वर्षापूर्वी देखील मी मतदान करायला आले होते. त्यामुळे यावेळी देखील आले. तरुणपिढी देशाच्या विकासाला दिशा देत असतात. त्यामुळे त्यांनी मतदान करावे. घरात बसून अडचणी सुटत नसतात पुढाकार घ्यावा लागतो. तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे अमृता देवकर म्हणाल्या.

टॅग्स :Pune Newspune