सांगली ः संक्षिप्त बातम्या

सांगली ः संक्षिप्त बातम्या
Published on

महिला शेककरी
प्रशिक्षणासाठी रवाना
शिराळा, जि. सांगली : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वास कारखान्यातर्फे ऊस उत्पादक महिला शेतकऱ्यांना वसंतदादा साखर संस्था (व्हीएसआय), मांजरी बुद्रुक (पुणे) येथे आधुनिक शेती प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. शेतकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचे पूजन कारखान्याचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. नाईक म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील महिलांना आधुनिक ऊस शेतीचे तंत्र व आधुनिक तंत्रज्ञान अवगत व्हावे, यासाठी ‘व्हीएसआय’मार्फत ‘ज्ञानलक्ष्मी’ प्रशिक्षण आयोजित केले जाते.’’ या वेळी छायाताई धोंडिराम पाटील (तडवळे), लिलावती संभाजी माळी (इंग्रुळ), विजया संभाजी पाटील व सविता संजय नाकील (नाटोली), शीतल प्रकाश मोरे (चिखलवाडी), कविता तानाजी मोहिते, वनिता शिवाजी मोहिते (वाडीचरण, शाहूवाडी) या शेतकरी महिलांना घेऊन जाणारे वाहन रवाना झाले. या वेळी उप ऊस विकास अधिकारी संदीप पाटील, विलास उत्तरकर उपस्थित होते.

उमदी परिसरात
खरीप हंगाम संकटात
उमदी, जि. सांगली : परिसरात जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या मोठ्या प्रमाणावर रखडल्या, तर जुलैमध्येही पावसाचा लहरीपणा कायम आहे. त्यामुळे खरीप हंगाम संकटात सापडला आहे. जत तालुक्याच्या पूर्व भागातील उमदी, गिरगाव, बालगाव, बोरगी, उटगी, सोनलगी, सुसलाद, तसेच सीमाभागातील गावांमध्ये शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत. मात्र पुरेशा पावसाअभावी पिकांची उगवण होईल की नाही, या बाबत मोठी चिंता आहे. या वर्षी जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने परिस्थिती बदलली आहे. जुलैमध्येही अधूनमधून पाऊस होत असला तरी तो शेतीसाठी पुरेसा ठरत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे खरीप पेरण्यांवर मोठा परिणाम झाला असून, अनेक भागांत पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे.

चिखलणी पद्धतीने
भातरोप लागवडीला वेग
पुनवत, जि. सांगली : शिराळा तालुक्यात २८ जून ते ८ जुलैदरम्यान झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाला गती मिळाली आहे. आगाऊ पेरणी केलेल्या पिकांची उगवण चांगली झाली असून, आतापर्यंत सुमारे ८० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. दरम्यान, वाकुर्डे परिसरासह तालुक्यातील भात उत्पादक भागात चिखलणी पद्धतीने भात रोपलागवडीची कामे वेगाने सुरू असून, मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक शेतकरी ‘पैरा’ पद्धतीचा अवलंब करीत आहेत. तालुक्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र २१ हजार ८७० हेक्टर असून, त्यापैकी भाताचे क्षेत्र सुमारे ११ हजार ५०० हेक्टर आहे. भाताची सुमारे ८० टक्के पेरणी पूर्ण झाली असून, जवळपास पाच हजार हेक्टर क्षेत्रात रोपलागवड झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com