बारामतीच्या आरोग्य विभागाला खरंच सलाम करायला हवा, कारण...

मिलिंद संगई
Sunday, 9 August 2020

सततचा कामाचा तणाव, रुग्णांमध्येच होणारा वावर आणि त्यातूनच कोरोनाग्रस्त होण्याची भीती....असे असतानाही संकटाच्या काळात बारामतीचा आरोग्य विभाग अक्षरशः युध्दभूमीवरील योध्द्याप्रमाणे अखंडीत लढत आहे. 

बारामती : सततचा कामाचा तणाव, रुग्णांमध्येच होणारा वावर आणि त्यातूनच कोरोनाग्रस्त होण्याची भीती....असे असतानाही संकटाच्या काळात बारामतीचा आरोग्य विभाग अक्षरशः युध्दभूमीवरील योध्द्याप्रमाणे अखंडीत लढत आहे. 

कोरोनाग्रस्तांसाठी बनवलेल्या रुग्णालयाला आग; ०७ जणांचा मृत्यू

कोरोनाचे संकट सुरु झाल्यापासून म्हणजेच 18 मार्चपासून या विभागातील सर्वांनी कामाला केलेली सुरवात आजही अव्याहतपणे सुरु आहे. सलग 145 दिवस एकही दिवस सुट्टी न घेता आरोग्य विभाग कार्यरत आहे. सततच्या बैठका, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे कमालीचे दडपण, अनेकदा रोषाला सामोरे जावे लागण्यासह अनेक अडचणींवर मात करत स्वताःच्या कौटुंबिक व इतर अडचणी दूर ठेवत आरोग्य विभागाचे पुरुष व महिला अधिकारी व कर्मचारी रात्रीचा दिवस करुन लोकांचे जीव वाचविण्यासाठी कार्यरत आहेत. या विभागातील कोणीही गेल्या जवळपास पाच महिन्यात एकही सुट्टी घेतलेली नाही.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे डॉ. सदानंद काळे, रुई रुग्णालयाचे डॉ. सुनील दराडे व डॉ. मस्तुद, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे यांच्यासह शेकडो हात या संकटसमयी समाजाप्रती असलेली आस्था प्रकट करत सुट्टी न घेता सलगपणे काम करीत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सकाळी सहाच्या सुमारास सुरु होणारा दिवस रात्री बाराच्या सुमारास संपतो. काही तासांची मोजकी झोप घेऊन ही मंडळी पुन्हा नव्या जोमाने नव्या दिवशी कामाला लागतात. टीका झाली, रोष पत्करला, मनस्ताप झाला तरीही समाजाप्रती आपली जबाबदारी आहे असे मानून आरोग्य विभागाची टीम रात्रंदिवस झटते आहे.

बारामती तालुक्यात 250 आशावर्कर, 52 परिचारिका, 38 पुरुष, आठ लॅब टेक्निशियन, 18 डॉक्टर्स, नऊ फार्मसी ऑफिसर, 36 कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, 14 सुपरवायझर, तर सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात 14 डॉक्टर्स, 18 परिचारिका व 18 इतर कर्मचारी, रुई रुग्णालयात 22 डॉक्टर्स, 8 परिचारिका, 11 इतर कर्मचारी तर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळा व इतर कामांसाठी 12 डॉक्टर्स व 7 इतर कर्मचारी कार्यरत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोनाचे संकट वैश्विक आहे, त्यात सर्वात जास्त जबाबदारी आरोग्य विभागाचीच असल्याने आम्ही सर्वच जण हे काम मनापासून करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आरोग्य विभागाचे मनोधैर्य कमी होणार नाही याची काळजी घेतानाच कोणाचाही मृत्यू होऊ नये याला आमचे प्राधान्य आहे. समाजानेही आरोग्य विभागाची भूमिका समजून घेत सहकार्य करावे- डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्यअधिकारी, बारामती

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The work of the health department of Baramati is impressive