Pune | सहकारी संस्थांचे काम स्वायत्त असावे; सहकार आयुक्त अनिल कवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहकारी संस्थांचे काम स्वायत्त असावे; सहकार आयुक्त अनिल कवडे
सहकारी संस्थांचे काम स्वायत्त असावे; सहकार आयुक्त अनिल कवडे

सहकारी संस्थांचे काम स्वायत्त असावे; सहकार आयुक्त अनिल कवडे

पुणे - ‘सहकारामुळे दरडोई उत्पन्नात वाढ आणि सर्वांच्या जीवनात समृद्धी निर्माण करणे शक्य झाले. सहकारातील धोके आणि संधी यांच्याकडे योग्य पद्धतीने बघणे गरजेचे आहे. सहकारी संस्थांना स्वायत्तता असावी. सहकारी संस्थानी दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वायत्त पद्धतीने काम करावे. सहकारी संस्थांच्या कारभारात वेग, अचूकता आणि पारदर्शकता या तीन बाबी महत्त्वाच्या असून, त्याची योग्य अंमलबजावणी केल्यास सहकार चळवळीमध्ये तरुणांचा सहभाग वाढेल,’’ असे मत सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी व्यक्त केले.

‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयात ‘विना सहकार नाही उद्धार’ या पुस्तिकेचे प्रकाशन कवडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार, सहयोगी संपादक संभाजी पाटील, वरिष्ठ उपसंपादक नीलेश शेंडे, प्रिंसीपल करस्पॉन्डन्ट अनिल सावळे, जाहिरात व्यवस्थापक संतोष पोटे, जाहिरात सहायक व्यवस्थापक संजय घोरपडे, सुनील पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

कवडे म्हणाले, ‘‘संचालकांकडे कौशल्ये असावीत, ही सहकाराची मूळ विचारधारा असून, त्याचे पालन करणे गरजेचे आहे. सभासदांमध्ये संस्थेबाबत आत्मीयता आणि आस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. प्रामाणिकता, कष्टाची तयारी, एकमेकांना सहकार्य या मूल्यव्यवस्थेवर आधारित सहकारी संस्था उभारल्या, परंतु त्यालाच धक्का लागतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सभासदांमध्ये कर्ज वेळेवर परत करण्याची भावना निर्माण झाली पाहिजे.’’

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात २१० नवीन कोरोना रुग्ण

फडणीस म्हणाले, ‘‘तरुण पिढी सहकार चळवळीच्या नेतृत्वापासून दूर का जात आहे, याबाबत ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने सर्वेक्षण सुरू आहे. तसेच, सहकारी बॅंकिंग, साखर उद्योग, दुग्ध, पोल्ट्री अशा विविध शेतीपूरक व्यवसायाला सक्षम करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.’’ नीलेश शेंडे यांनी प्रास्ताविक; तर विशाल सराफ यांनी सूत्रसंचालन केले. शीतल पवार यांनी आभार मानले.

एखाद्या सर्वसाधारण सभेत किती सभासद योगदान देतात, अध्यक्ष आणि सचिव बघून घेतील, ही भावना चुकीची आहे. बऱ्याचदा चांगले काम करणाऱ्या संचालकांवरही टीका केली जाते, त्यातून ते खचून जातात. त्यामुळे योग्य काम करणाऱ्या संचालकांना प्रोत्साहनही देणे गरजेचे आहे. तरुण संचालक पिढीने व्यवहारात संगणकाची जोड देऊन विश्वासार्हता जपणे गरजेचे आहे. त्यामुळे सहकार चळवळ मजबूत होईल.

- अनिल कवडे, सहकार आयुक्त

loading image
go to top