
किरकटवाडी (पुणे) : मोठा गाजावाजा करत सुरु झालेल्या सिंहगड रस्त्याच्या कामाला अवघ्या काही दिवसांमध्ये तीन वर्षे पूर्ण होतील; परंतु रस्त्याची स्थिती 'जैसे थे'च आहे. मागील दोन वर्षांपासून सिंहगड रस्ता खोदून ठेवल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. आता पुन्हा पावसाळा सुरू झाला आहे तरीही सिंहगड रस्ता अजूनही खड्डयातच आहे.
सिंहगड रस्त्याच्या कामाला नांदेड फाट्यापासून सुरुवात करण्यात आली. 'हायब्रीड अॅन्युईटि'या पद्धतीने 'रोडवेज सोल्युशन' या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. कंपनीच्या ठेकेदारांनी रस्त्याचे काम सलग न करता नांदेड फाट्यापासून ते डोणजे फाट्यापर्यंत अनेक ठिकाणी केवळ रस्ता खोदून ठेवलेला आहे. रस्ता खोदून ठेवल्यामुळे व कामाची गती अतिशय संथ असल्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक, पर्यटक अक्षरशः हैराण झाले आहेत.
उन्हाळ्यामध्ये धूळ आणि पावसाळ्यामध्ये खड्डयांचा असा नेहमीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्डयांचा अंदाज न आल्याने अनेक अपघात सिंहगड रस्त्यावर घडत असतात. अनेक नागरिकांना या रस्त्यावरील खड्डयांमुळे गंभीर दुखापती झालेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याच्या कामाकडे का दुर्लक्ष करत आहे? हे सर्वसामान्यांसाठी न उलगडलेले कोडे आहे. सिंहगड रस्त्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक गावांतील लोकप्रतिनिधींनी रस्त्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केलेला आहे.
;
खडकवासला गावचे सरपंच सौरभ मते यांना तर ठेकेदाराने "लवकर रस्त्याचे काम पूर्ण करून घेतले जाईल" असे लेखी आश्वासन दिले होते; मात्र याचाही विसर ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला पडल्याचे दिसत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता यांच्याशी सिंहगड रस्त्याच्या कामाबाबत 'सकाळ'ने ही वेळोवेळी विचारणा केलेली आहे. मात्र, नेहमी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ज्ञानेश्वर राठोड यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता," 'लॉकडाऊन' असल्यामुळे जिल्हाधिकार्यांची परवानगी मिळाल्यानंतरच कामाला सुरुवात केली जाईल. तहसीलदारांकडून काम सुरू करण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आलेला आहे परंतु त्यास परवानगी मिळाली नाही"असे कारण त्यांच्याकडून सांगण्यात आले. अगोदरच कामाबाबत टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारासाठी 'लॉकडाउन' चे कारण चांगलेच पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सांगत असलेल्या कारणांबाबत विचारणा केली असता, "अत्यावश्यक कामांना याअगोदरच परवानगी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे लॉकडाउनमध्ये सुरू होती. अधिकारी व ठेकेदारांकडून कामाबाबत टाळाटाळ होत असेल तर कागदपत्रांची पडताळणी करून योग्य कारवाई केली जाईल", असे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.