उन्हाळ्याच्या सुटीत शिक्षकांना काम 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

शिक्षकांची दिवाळीची सुटी निवडणुकीच्या कामात गेल्यानंतर आता उन्हाळी सुटीलाही कात्री लागणार आहे. सुटीदरम्यान शिक्षकांना जनगणनेचे काम करावे लागणार असल्याने त्यांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत.

पिंपरी - शिक्षकांची दिवाळीची सुटी निवडणुकीच्या कामात गेल्यानंतर आता उन्हाळी सुटीलाही कात्री लागणार आहे. सुटीदरम्यान शिक्षकांना जनगणनेचे काम करावे लागणार असल्याने त्यांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत. त्यासाठी त्यांच्या मे महिन्यातील सुट्ट्याही रद्द केल्या जाणार आहेत. जनगणना अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना तशा नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावर्षी लोकसभा आणि विधान निवडणुकांच्या कामात शिक्षक गुंतले होते. निवडणुकीची कामे, त्याचे प्रशिक्षण यात शिक्षकांच्या दिवाळी सुटीचे दिवस कमी झाले होते. आता उन्हाळी सुटीही जाणार आहे. यंदा जनगणना 2021 चे काम सुरू झाले आहे. त्यासाठी शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरांना क्रमांक देणे, गटाची विभागणी करणे, घर यादी तयार करणे आदी कामे 1 मे ते 15 जून 2020 या कालावधीत हे काम करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा झाल्यावर एप्रिलपासून सुटी मिळत असली तरी शिक्षकांची सुटी एक मेपासून सुरू होते. त्यापूर्वी शिक्षकांना परीक्षा, निकाल यांची कामे असतात. राज्यातील शाळा या 16 जूनला सुरू होतात. त्यामुळे यंदा शिक्षकांना वर्षाच्या 76 पैकी 39 सुट्ट्यांवर गदा येणार आहे. 

मुख्यालय न सोडण्याचा आदेश 
शिक्षकांना जनगणनेच्या कालावधीत शाळा व मुख्यालय सोडण्यास परवानगी देऊ नये, किंबहुना रजा मंजुरीस शिफारस करू नये. तसेच शिक्षकांना परवानगी दिल्यास व त्याचे गैरहजेरीमध्ये जनगणना कामकाजात व्यत्यय निर्माण झाल्यास संबंधित मुख्याध्यापकांस जबाबदार धरण्यात येणार आहेत. परिणामी, महापालिका आणि खासगी शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांनी या कालावधीत मुख्यालय सोडून जाऊ नये, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work for teachers on summer vacations