
मेट्रो कारशेडचे काम करताना ५० फुटावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू
पुणे : मेट्रो कारशेडचे काम करताना तब्बल पन्नास फूट उंचीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शनिवारी दुपारी दिड वाजता वनाज येथे घडली. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मूलचंद्रकुमार सीताराम (वय १९, मूळ. रा. उत्तर प्रदेश) असे मृत्यु झालेल्या कामगाराचे नाव आहे.वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताराम हा तीन महिन्यापासून मेट्रोच्या कामानिमित्त पुण्यात राहात होता.
कोथरूड येथील मेट्रो शेडचे काम सध्या सुरू आहे. तेथेच तो शनिवारी काम करीत होता. दुपारी दिड वाजता पन्नास फूट उंचीवरून खाली कोसळला. त्याने सुरक्षा कीट परिधान केले होते.परंतु सुरक्षिततेसाठी आवश्यक हुक त्याने अडकविले नसल्याने तो खाली पडला. या घटनेत त्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मेट्रो प्रशासनाने त्याचा मृतदेह उत्तरप्रदेशातील त्याच्या गावी कुटुंबीयांकडे पाठविला आहे. या प्रकरणाचा तपास कोथरूड पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, संबंधित कामगाराच्या मृत्यूच्या घटनेची विभागीय चौकशी करण्यात येणार असून कामगाराच्या कुटुंबीयांना मदत दिली जाणार आहे. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आवश्यक काळजी घेण्यात येणार असल्याचे मेट्रोतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
Web Title: Worker Dies After Falling From Fifty Feet While Working Metro Car Shed Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..