
शिक्षणासाठी कामगारांची मुले चालली परदेशी
पिंपरी - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगारांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तींमुळे कामगार, कष्टकरी यांची मुलेही आता परदेशात उच्च शिक्षणासाठी जाऊ लागली आहेत. यंदा आतापर्यंत अशा २९ जणांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ नुसार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. हा अधिनियम राज्यातील पाचपेक्षा जास्त कामगार असलेल्या सर्व आस्थापनांना लागू आहे. यात कारखाने, सर्व दुकाने यांचा समावेश आहे. राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी मंडळ काम करते. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी भरणारे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. मंडळाला वर्षातून दोन वेळेस (जून आणि डिसेंबर) निधी मिळतो. कामगारांच्या वेतनातून आस्थापनांच्या वतीने या निधीची रक्कम कपात करून मंडळाकडे जमा करण्यात येते. या निधीतून कामगार योजना राबविल्या जातात. सर्वसाधारण शिष्यवृत्ती, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, दिव्यांग शिष्यवृत्ती, क्रीडा, परदेशात शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती दिली जाते.
सर्वसाधारण शिष्यवृत्तीमध्ये पदवी, पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणासाठी दोन ते पाच हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पाच हजार, केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आठ हजार व शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यास ५० हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. एमएससीआयटी परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले असल्यास सरकारमान्य शुल्काच्या ५० टक्के रक्कम अर्थसाह्य दिले जाते.
पात्र कामगारांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सुविधा मिळत नसतील त्यांनी मंडळाच्या सहकारनगरमधील कार्यालयात संपर्क साधावा. शिष्यवृत्तीसाठी सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविण्यात येतात. पात्र लाभार्थींना फेब्रुवारीपर्यंत रकमेचे वाटप केले जाते.
- समाधान भोसले, सहायक आयुक्त, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
Web Title: Workers Children Abroad Education
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..