शिरूरच्या आमदारांच्या कारखान्यासमोरच कामगारांचा ठिय्या, कारण...

शिरूरच्या आमदारांच्या कारखान्यासमोरच कामगारांचा ठिय्या, कारण...
Updated on

शिरूर : गेल्या आठ महिन्यांपासूनचा पगार मिळावा या व इतर मागण्यांसाठी न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यातील कामगारांनी आज काम बंद ठेवून कारखान्यासमोर ठिय्या दिला. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार यावेळी कामगारांनी केला.

कामगार नेते महादेव मचाले, आत्माराम पवार, सुनिल जगताप, शिवाजी कोकडे, यशवंत शेंडगे, शिवाजी शेंडगे, कांतीलाल साळुंके आदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात बहुतांश कामगार सहभागी झाले होते. त्यामुळे कारखान्याचे दैनंदीन कामकाजही काहीसे विस्कळीत झाले. पगार मिळण्याच्या मागणीसाठी कामगार सकाळीच कारखान्याच्या प्रवेशव्दाराजवळ आले. त्यानंतर तेथेच ठिय्या मारला. कारखाना प्रशासनाशी कामगार प्रतिनिधींची दोन वेळा चर्चा झाली, परंतू सायंकाळी उशिरापर्यंत त्यातून मार्ग निघू शकला नाही. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घोडगंगाचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांना कामगारांनी दिलेल्या निवेदनात, सात महिन्यांचा पगार मिळावा, पगारवाढीच्या १५ टक्के फरकाची रक्कम (माहे जुलै २०१५ ते मे २०१७) मिळावी, रिटेन्शन अलाऊंन्स मिळावा, भविष्य निर्वाह निधीची नोव्हेंबर २०१९ पासूनची व विमा पॉलिसीची पाच महिन्यांपासूनची़ तसेच कामगार सोसायटी कपातीची रक्कम भरावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पगारासह अनेक प्रलंबित मागण्यांबाबत अनेकदा मागणी करूनही दखल घेतली न गेल्याने अखेर सर्वच कामगार एक होऊन आंदोलनात सहभागी झाले. कर्मचाऱयांना २०१५ पासून ओव्हर टाईमची रक्कम दिली नाही. ड्रेस कोड दिला तथापि चार वर्षापासून नवीन कपडेच मिळालेले नाहीत. कर्मचाऱयांच्या पगारातून कपात केलेली इतर बॅंकांच्या कर्जाची रक्कम वर्ग केली जात नाही. सामान्य कामगारांच्या मागण्यांबाबत कारखाना प्रशासनाने सहानुभूतीने विचार करावा. -महादेव मचाले, कामगार नेते. 

कामगारांच्या पगाराबाबत कारखाना प्रशासन गंभीर आहे. त्यासाठी प्राधान्याने नियोजन केले जात आहे.  तथापि, कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे बॅंकांकडील कर्ज मिळण्यात उशिर झाला. शिवाय कारखाना प्रशासनातील दहा कर्मचाऱयांनाही कोरोनाची बाधा झाल्याने दैनंदीन कामकाज विस्कळीत झाले. या अचानकच्या अडचणींतूनही मार्ग काढला असून, आज - उद्याच पगाराचा प्रश्न मार्गी लागणार आहे.-प्रवीण शिंदे, कार्यकारी संचालक, रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना, न्हावरे 

कारखान्याच्या अध्यक्षांची भूमिका- सद्यस्थितीत साखर कारखानदारी अडचणीत असून, याला यापूर्वीच्या भाजप सरकारची धोरणे कारणीभूत आहे. कारखानदारी समोरील अडचणीत रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखानाही अपवाद नाही. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून कारखान्यांचे प्रश्न मार्गी लागत असताना आणि कारखानदारी पुन्हा उभारी घेत असताना कामगारांनी संयमी भूमिका घ्यावी, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष,  आमदार ॲड. अशोक पवार यांनी केले. 

पगार व इतर मागण्यांसाठी कामगारांनी चर्चेऐवजी आंदोलनाचा मार्ग स्विकारल्याबद्दल ॲड. पवार यांनी खेद व्यक्त केला.  ते म्हणाले, "घोडगंगाने मोठी गुंतवणूक करून सहवीजनिर्मीती प्रकल्प उभारला. परंतू, यापूर्वीच्या सरकारने वीजखरेदीचा करार करण्यास उशीर केल्याने कारखान्याचे मोठे नूकसान झाले. कर्जाचे हप्ते वेळेत जाऊ शकले नाहीत आणि व्याजाचा मोठा भूर्दंड कारखान्याला सहन करावा लागला. आता अजितदादांनी पुढाकार घेतल्याने कारखानदारी पूर्वपदावर येत आहे. दादांच्या माध्यमातूनच राज्य सहकारी बॅंकांनी कारखान्याला कर्ज उपलब्ध करून दिले आहे. त्यातून कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी चालू गळीत हंगाम सुरू करण्यासाठीच्या नियोजनाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यातून शेतकी खात्याला प्रथम निधी देताना उसतोड कामगारांना ॲडव्हान्स द्यावा लागणार आहे. कामगारांचे पगार देखील दिलेच पाहिजे. त्यात टप्प्याटप्प्याने मार्ग काढताना काही रक्कम लगेचच दिली जाईल. परंतू त्यासाठी आततायी भूमिका घेऊन आपली रोजीरोटी असलेल्या संस्थेसमोर ठिय्या देणे चूकीचे आहे. कामगारांनी संयम ठेवून प्रशासनाशी चर्चा करावी."

पवार पुढे असेही म्हणाले की, कारखाना सुरू होणे, सुस्थितीत चालणे हे सर्वांच्याच हिताचे आहे. प्राधान्य कशाला द्यावे लागणार आहे, हे देखील सुजाण कामगार वर्गाला माहिती आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत कुणीही चूकीची भूमिका घेऊ नये. आपल्या घरातील प्रश्न आपण घरात बसून सोडवू. चव्हाट्यावर मांडून नव्हे़; तर आपापसातील समन्वयातून ते सुटणार आहेत."

(संपादन : सागर दिलीपराव शेलार) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com