

पान १२- ८ साठी
०००००००००००००००००००००
स्लग ः जागतिक अंडी दिन
०००००००००००००००००००००००००
गुणवत्तापूर्ण अंडी उत्पादनाची गरज
-------------------
कोंबड्यांचे आरोग्य, संतुलित पोषण, स्वच्छ आणि सुरक्षित पाणी, जैवसुरक्षा, योग्य शेड व्यवस्थापन, पुरेसे वायुविजन आणि रोगांचे प्रभावी नियंत्रण यांचा अंडी उत्पादनावर थेट परिणाम होतो.आजच्या काळात केवळ जास्त अंडी उत्पादन करणे पुरेसे नाही. सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि सातत्यपूर्ण अंडी उत्पादन हे तितकेच महत्त्वाचे आहे.
----------------------
डॉ. गजानन सोळंके
----------------------------
दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी ‘जागतिक अंडी दिन’ साजरा केला जातो. अंड्याचे पोषणमूल्य, आरोग्यातील महत्त्व तसेच कुक्कुटपालन क्षेत्राचे आर्थिक आणि सामाजिक योगदान याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. अंडे हे केवळ रोजच्या आहारातील एक पदार्थ नसून परवडणारे, सहज उपलब्ध आणि उच्च दर्जाचे पोषण देणारे अन्न आहे. त्यामुळे पोषण सुरक्षा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अंड्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.
अंडी उत्पादनाचा फायदा केवळ ग्राहक आणि शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहत नाही. लेअर कुक्कुटपालनामुळे हॅचरी, फीड उद्योग, औषधे व लसी, उपकरणे, वाहतूक, मजूर, अंडी संकलन, घाऊक व किरकोळ विक्री अशा संपूर्ण मूल्यसाखळीत रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतात. लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी योग्य नियोजन, दर्जेदार पिले, संतुलित खाद्य, तांत्रिक मार्गदर्शन आणि खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध झाल्यास लेअर कुक्कुटपालन हे नियमित उत्पन्नाचे प्रभावी साधन ठरू शकते. २०२४-२५ मध्ये भारतात प्रति व्यक्ती १०६ अंडी प्रति वर्ष उपलब्ध होती, जी २०१४-१५ मधील ६२ अंड्यांच्या तुलनेत लक्षणीय वाढ आहे. विविध सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक घटकांमुळे अंडी सेवनामध्ये राज्यनिहाय मोठी तफावत आहे. त्यामुळे अंड्याच्या पोषणमूल्याबाबत वैज्ञानिक आणि योग्य माहिती ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.
योग्य व्यवस्थापनाची गरज ः
लेअर फार्ममध्ये विशेषतः कॅल्शिअम व फॉस्फरसचे योग्य व्यवस्थापन अंड्याच्या कवचाच्या गुणवत्तेसाठी महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे उष्णतेच्या ताणाच्या काळात पाणी सेवन वाढते आणि खाद्य सेवन, अंडी उत्पादन तसेच कवचाची गुणवत्ता प्रभावित होऊ शकते. त्यामुळे उन्हाळा आणि मॉन्सूनसाठी योग्य व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे. कुक्कुटपालन क्षेत्रासमोरील महत्त्वाच्या आव्हानांपैकी अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) हे एक आहे. कोंबड्यांच्या उपचारासाठी प्रतिजैविकांची आवश्यकता असल्यास त्यांचा वापर योग्य निदानानंतर आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक आहे.
अनावश्यक प्रतिजैविकांचा वापर टाळणे, योग्य डोस आणि उपचाराचा कालावधी पाळणे तसेच संबंधित औषधांसाठी लागू असलेला कालावधी काटेकोरपणे पाळणे ही उत्पादकाची जबाबदारी आहे. यामुळे ग्राहकांना सुरक्षित अंडी उपलब्ध होण्यास मदत होते आणि प्रतिजैविकांच्या विवेकी वापराला प्रोत्साहन मिळते.
भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अंडी उत्पादक देश आहे. आता पुढील उद्दिष्ट केवळ उत्पादन वाढविणे नसून सुरक्षित अंडी, योग्य पोषण, जबाबदार कुक्कुटपालन आणि शाश्वत उत्पादन यांचा समतोल साधणे हे असले पाहिजे. अंड्याच्या प्रत्येक कवचामागे कुक्कुटपालकाची मेहनत, पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे तांत्रिक योगदान, खाद्य व औषध उद्योगाची भूमिका, वाहतूक आणि बाजारपेठेची संपूर्ण साखळी कार्यरत असते. त्यामुळे अंडे हे केवळ एका पक्ष्याचे उत्पादन नसून शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेपासून ते कुटुंबाच्या पोषणापर्यंत जोडणाऱ्या संपूर्ण मूल्यसाखळीचे प्रतीक आहे.
----------------
इन्फो ः
उत्पादनाचा वाढता आलेख ः
१) अंडी उत्पादनाच्या बाबतीत भारताने गेल्या दशकात मोठी प्रगती केली आहे. FAOSTAT च्या आकडेवारीनुसार भारत अंडी उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२४-२५ मध्ये देशात सुमारे १४९.११ अब्ज अंड्यांचे उत्पादन झाले. २०१४-१५ मध्ये हे उत्पादन ७८.४८ अब्ज होते. म्हणजेच गेल्या दशकात देशातील अंडी उत्पादनात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.
२) देशांतर्गत उत्पादनात २०२४-२५ मध्ये आंध्र प्रदेश १८.३७ टक्के वाट्यासह प्रथम क्रमांकावर, तमिळनाडू १५.६३ टक्के, तेलंगणा १२.९८ टक्के, पश्चिम बंगाल १०.७२ टक्के आणि कर्नाटक ६.६७ टक्के वाट्यासह अनुक्रमे पुढील क्रमांकावर आहेत. ही पाच राज्ये मिळून देशाच्या एकूण अंडी उत्पादनापैकी ६४ टक्क्यांहून अधिक उत्पादन करतात.
३) महाराष्ट्राचाही देशातील अंडी उत्पादनात महत्त्वाचा वाटा असून, २०२४-२५ मध्ये राज्याचा राष्ट्रीय उत्पादनातील वाटा सुमारे ६.१३ टक्के होता.
----------
इन्फो ः
उच्च दर्जाच्या पोषणाचा स्रोत ः
१) अंड्यामध्ये शरीराच्या वाढीसाठी आणि दैनंदिन कार्यासाठी आवश्यक असलेली उच्च जैविक मूल्याची प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि विविध सूक्ष्म पोषक घटक आढळतात.
२) अंड्यातील प्रथिनांमध्ये शरीराला आवश्यक असलेली सर्व अत्यावश्यक अमिनो आम्ले योग्य प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे वाढत्या वयातील मुले, किशोरवयीन, प्रौढ, वृद्ध व्यक्ती तसेच नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तींसाठी अंडे हा उपयुक्त प्रथिन स्रोत आहे.
३) अनेक प्रथिनांच्या स्रोतांच्या तुलनेत अंडे सहज उपलब्ध असून त्याची किंमतही तुलनेने परवडणारी आहे. त्यामुळे कुपोषण आणि प्रथिनांच्या कमतरतेशी लढताना अंड्याची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
------------
इन्फो ः
एका अंड्यातील घटक ः
१) साधारण ५० ग्रॅम वजनाच्या एका मोठ्या कोंबडीच्या अंड्यामध्ये अंदाजे ७२ ते ७५ किलोकॅलरी ऊर्जा, ६.३ ग्रॅम प्रथिने, ४.८ ते ५ ग्रॅम चरबी आणि ०.४ ते ०.६ ग्रॅम कर्बोदके असतात. याशिवाय सुमारे २५ ते ३० मिग्रॅ कॅल्शिअम, ८५ ते ९० मिग्रॅ फॉस्फरस, ०.९ मिग्रॅ लोह आणि ६० ते ६५ मिग्रॅ सोडिअम मिळते.
२) जीवनसत्त्व अ,ड, इ, बी-२, बी-१२, फोलेट, कोलीन, झिंक आणि सेलेनियम यांसारखे महत्त्वाचे सूक्ष्म पोषक घटक असतात.
३) अंड्याच्या पिवळ्या बलकात कोलीन, ल्यूटिन आणि झीएक्सॅन्थिन यांसारखे महत्त्वाचे घटक आढळतात. त्यामुळे अंडे हे केवळ प्रथिनांचे नव्हे, तर विविध पोषक घटकांचे एक संकुल आहे.
४) अंड्यातील कोलीन, ल्यूटिन आणि झीएक्सॅन्थिन यांसारखे घटक अनुक्रमे मेंदूचे कार्य आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे अंड्याकडे केवळ प्रथिनांचा स्रोत म्हणून न पाहता बहुपोषक अन्न म्हणून पाहणे आवश्यक आहे.
------------------
संपर्क ः डॉ. गजानन सोळंके, ९४०५०६१८९२
(लेखक कुक्कुटपालन तज्ज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.