
जागतिक सर्पदंशतज्ञ डॉ. राऊत यांना महाराष्ट्र शासनाचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर
नारायणगांव : पुणे, ठाणे व नगर जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील सर्पदंश झालेल्या सुमारे पाच हजार रुग्णांना जीवदान देऊन मागील तीन दशके वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करणारे नारायणगाव येथील हृदयरोग,
जागतिक सर्पदंश व विषबाधा तज्ञ डॉ.सदानंद राऊत यांना महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
२३ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी सात वाजता मुंबई येथील रंगशारदा सभागृह होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ.सदानंद राऊत यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,पालकमंत्री दिपक केसरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत आदी उपस्थित राहणार आहेत.
डॉ .सदानंद राऊत, डॉ.पल्लवी राऊत हे मागील तीन दशके ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देत आहेत. हृदयविकार, सर्पदंश ,विषबाधा झालेल्या अनेक रुग्णांना त्यांनी जीवदान दिले आहे.
केरळमधील पूरग्रस्तांसाठी अठरा लाख रुपयांची सर्पदंशावरील लस मोफत पुरविली होती. हृदयविकार,मधुमेह, रक्तदाब, कुपोषण , सर्पदंश प्रतिबंधासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करत आहेत.
या कार्याची दखल घेऊन मागील वर्षी डॉ. राऊत यांना इंडियन मेडिकल असोशिएशन ( आयएमए) च्या वतीने प्रतिष्ठित डॉ.ज्योती प्रशाद गांगुली या राष्ट्रीय पुरस्काराने तसेच शिवजयंती निमित्त राज्य शासनाच्या वतीने शिवनेर भूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे .डॉ. राऊत यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल आमदार अतुल बेनके, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. हनुमंत भोसले यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
●अतुल बेनके( आमदार, जुन्नर): डॉ. राऊत हे ग्रामीण, आदिवासी भागात सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवा करत आहेत.त्यांच्या उपचारामुळे सर्पदंश झालेल्या हजारो शेतकऱ्यांना जीवदान मिळाले आहे. राज्य शासनाने त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची पावती दिली आहे.त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा.