गाडीखान्यातील एक्‍स रे मशिन बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

महापालिकेच्या गाडीखाना रुग्णालयातील एक्‍स रे मशिन गेल्या दीड वर्षापासून बंद असल्याने गरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. संपूर्ण शहरात गरीब व गरजू रुग्णांना मोफत एक्‍स रे काढून मिळणारे हे एकमेव मशिन बंद पडूनही त्याकडे महापालिकेच्या आरोग्य खात्याने लक्ष दिले नाही, असे सजग नागरिक मंचच्या विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पुणे - महापालिकेच्या गाडीखाना रुग्णालयातील एक्‍स रे मशिन गेल्या दीड वर्षापासून बंद असल्याने गरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. संपूर्ण शहरात गरीब व गरजू रुग्णांना मोफत एक्‍स रे काढून मिळणारे हे एकमेव मशिन बंद पडूनही त्याकडे महापालिकेच्या आरोग्य खात्याने लक्ष दिले नाही, असे सजग नागरिक मंचच्या विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महानगरपालिकेच्या गाडीखाना येथील दवाखान्यात दहा वर्षांपूर्वी एक्‍स रे मशिन बसवण्यात आले. या मशिनवर शहरातील गरजू रुग्णांना मोफत एक्‍स रे काढून मिळण्याची सोय होत होती. दीड वर्षांपूर्वी हे मशिन बंद पडले. मात्र, ते अद्यापही बंद अवस्थेत आहे, असेही त्यांनी यात नमूद केले. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात अद्ययावत डिजिटल एक्‍स रे मशिन ते दीड वर्षांपूर्वी क्रस्ना लॅबोरेटरीला देऊन टाकले. ही संस्था पैसे घेऊन सेवा देते. गाडीखान्यातील बंद पडलेले मशिन दीड वर्षात दुरुस्त केले नाही किंवा नवीन मशिनचीही खरेदी केली नाही. खासगी दवाखाने व रुग्णालये येथील एक्‍स रे मशिन्स सुमारे २० वर्षे कार्यान्वित राहतात, मग महापालिकेचे मशिन जेमतेम दहा वर्षांत निकामी कशी होतात, असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करावी आणि गाडीखान्यातील एक्‍स रे मशिन दुरुस्त होईपर्यंत गरीब व गरजू रुग्णांना कमला नेहरू रुग्णालयातील एक्‍स रे मशिनवर मोफत एक्‍स रे काढून मिळण्याची सोय करावी, अशी मागणीही वेलणकर यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: X ray machine close in gadikhana hospital