esakal | अनाथ - बेघर व मनोरुग्णांच्या सेवेसाठी " यशोधन ट्रस्ट " ला द्या मदतीचा हात

बोलून बातमी शोधा

Yashodhan trust needs donations for social work

आजपर्यंत "यशोधन ट्रस्ट" च्या माध्यमातून हजारो लोकांना मदत झाली आहे , अनेक अनाथ - बेघर व मनोरुग्णांना हक्काचा निवारा मिळाला आहे. आज "यशोधन ट्रस्ट" च्या मालकीच्या जागेत गजानंत निवारा केंद्र सुरु आहे.

अनाथ - बेघर व मनोरुग्णांच्या सेवेसाठी " यशोधन ट्रस्ट " ला द्या मदतीचा हात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे: पुण्यावरून साताऱ्याकडे जाताना खंबाटकी घाटा जवळ वेळे गावाच्या हद्दीत समाजातील अनाथ, बेघर वयोवृद्ध, मनोरुग्ण लोकांचे यशोधन ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेद्वारे संचलीत गजानंत निवारा केंद्र आहे. वाई तालुक्यातील रवी बोडके या तरुणाने समाजाने नाकारलेल्या लोकांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी " यशोधन ट्रस्ट " या स्वयंसेवी संस्थेचे स्थापना केली.

शेतकरी कुटुंबात रवी बोडके लहानाचे मोठे झाले महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना समाजसेवेची आवड निर्माण झाली. आपण समाजाचे काही तरी देणं लागतो, या भावनेने समाजातील गरजू, निराधार , अनाथ , बेघर मनोरुग्ण आणि वंचितांसाठी २००५ मध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली. ज्या वयात नोकरी करून पैसे कमवायचे, त्या वयात समाजसेवेचे व्रत हाती घेतले होते. घरातील लोक नाराज होते. पण बोडके यांनी मदतीचे काम सुरू ठेवले. २०१२ पासून यशोधन ट्रस्ट च्या कामाचा व्याप वाढला. अनेक अनाथांना व निराधारांना मदत करताना अनंत अडचणी येऊ लागल्या त्यात प्रमुख अडचण अशी होती की , रस्त्यावरील अनाथ - बेघर मनोरुग्णांना ठेवायचे कुठे ? त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सर्वात मोठा होता. बोडके यांनी अनाथांसाठी स्वतःचा निवारा केंद्र सुरू करण्याचे ठरवले. सुरवातीला भाड्याच्या जागेत निवारा केंद्र सुरू केले.

रस्त्यावरून या अनाथांना व मनोरुग्णांना उचलून आणायचे , स्वच्छ करायचे , डॉक्टरांकडे उपचारांसाठी न्यायचे असा दिनक्रम सुरु झाला. काही दिवस अशा लोकांना निवारा केंद्रात ठेवून त्यांची योग्य सर्वप्रकारची काळजी घेऊन , काही दिवसांनी संस्थेमार्फ़त अशा अनाथ , बेघर लोकांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना आप-आपल्या कुटुंबात सुरक्षित पोहोचविले जाते. तसेच मानसिक रुग्णांना पुढील उपचारांसाठी मनोरुग्णालयात दाखल केले जाते. अशा मनोरुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन, कुटुंबाच्या ताब्यात दिले जातात. सध्या ४५ अनाथ - बेघर व मनोरुग्ण आहेत.

आजपर्यंत "यशोधन ट्रस्ट" च्या माध्यमातून हजारो लोकांना मदत झाली आहे , अनेक अनाथ - बेघर व मनोरुग्णांना हक्काचा निवारा मिळाला आहे. आज "यशोधन ट्रस्ट" च्या मालकीच्या जागेत गजानंत निवारा केंद्र सुरु आहे. काही वयोवृद्धांना आपल्याच पोटच्या मुलांनी वाऱ्यावर सोडलेले असते , अशा वयोवृद्धांना ही यशोधन ट्रस्ट च्या माध्यमातून निवारा दिला जातो. तसेच कालांतराने त्यांच्या मुलांना किंवा नातेवाईकांना भेटून त्यांचे समुपदेशन करून अशा वयोवृद्धांना परत त्यांच्या कुटुंबाबत पाठविले जाते. काही नातेवाईक परत नेण्यासाठी तयार होतात तर काही तयार होत नाहीत. अशा वेळी असे वयोवृद्ध लोक यशोधन ट्रस्ट संचालित निवारा केंद्रात शेवट पर्यंत सांभाळले जाते. निवारा केंद्रातील एखाद्या वयोवृद्धांचे निधन झाले तर , संस्थेकडून संबंधित मुलांना व नातेवाईकांना कळविले जाते. परंतु काही मुले अंत्यसंस्काराला सुद्धा येत नाहीत अशा वेळी संस्थेकडूनच अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे "यशोधन ट्रस्ट" द्वारे माणुसकी जिवंत ठेवण्याचे काम केले जात आहे. आपण ही या कार्याला देणगीरूपाने हातभार लावू शकतो.

"यशोधन ट्रस्ट" या स्वयंसेवी संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळे संस्था चालते. संस्थेचा दिवसाला होणारा खर्च खूप मोठा आहे. त्यातही अनाथ - बेघर व मनोरुग्णांच्या आरोग्य तपासणी व औषध - उपचारांचा खर्च मोठा आहे. संस्थेला सामूहिक आर्थिक मदतीची खूप गरज आहे. सकाळ माध्यम समूहाच्या "सोशल फॉर अॅक्शन" या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर यशोधन ट्रस्ट च्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती , माहिती -तंत्रज्ञान कंपन्या , सीएसआर कंपन्या व परदेशी - भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन यशोधन ट्रस्ट च्या उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

टीम SFA

support@socialforaction.com

अधिक माहितीसाठी संपर्क - ९९६०५००१४३