पुण्यात बघता बघता येरवडा परिसर बनला कंटेन्मेट झोन 

yerwada1.jpg
yerwada1.jpg

येरवडा (पुणे) : पुणे सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. पण, पुण्यात काही ठराविक भागांमध्येच कोरोनानं कहर केलाय. विशेषतः दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात कोरोनाला बळ मिळालंय. अशा वस्त्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. येरवडा परिसर हा त्यापैकी एक आहे. महिनाभरात हा परिसर कंटेन्मेट झोन बनलाय. जाणून घेऊया त्याची कारणं आणि तेथील सद्याची स्थिती 

येरवड्यात असे वाढले रुग्ण 
गेल्या महिन्यात लक्ष्मीनगर येथील ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाचा संसर्ग झाला होता. संबंधित नागरिकाच्या संयुक्त कुटुंबात सतरा जण सदस्य होते. त्यानंतर आठवड्याभरात येरवडा भाजी मंडईमध्ये चक्क अंडी विकणाऱ्या महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर महापालिकेच्या रुग्णालयातील औषध वाटप करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनाच कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर ही संख्या वाढतच गेली. कोरोनाचा वाढता संसर्ग असून देखील सुरवातीपासून प्रशासनाने गांभीर्याने घेतलेच नाही. येरवडा क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत बघता बघता कोरोना बाधितांचा आकडा 258 वर जाऊन पोहचला आहे. तसेच आतापर्यंत येथील 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

वैद्यकीय अधिकारी, महापालिका अधिकारी असो की लोकप्रतिनिधी (काही अपवाद) कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे मोटारीतून खाली उतरलेच नाहीत. काही लोकप्रतिनिधी तर अज्ञातवासात गेले. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी, मनोबल वाढवण्यासाठी ते कधी वस्त्यांमध्ये आलेच नाहीत. आरोग्य कर्मचाऱ्यांसह ठेकेदारी पद्धतीवर काम करणारे कोरोना वॉरिअर्स म्हणून आघाडीवर लढत होते. तर कार्यालयातील अभियंते व कर्मचारी आजारी असल्याची खोटी माहिती देऊन घरी क्वॉरंटाईन होत होते. 

22 हजार जणांची आरोग्य तपासणी
भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स आणि लुंकड रियालिटीच्या माध्यमातून "डॉक्टार आपल्या दारी' हा उपक्रम येथील नगरसेवक अविनाश साळवे यांनी यशस्वीपणे राबविला आहे. गेल्या महिनाभरात साधारणत: 22 हजार नागरिकांची आरोग्य तपासणी केली गेली आहे. त्यातूनच कोरोनाचा संसर्ग असलेल्या संशयित रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठविले गेले. साळवे यांचा हा यशस्वी प्रयोग पाहिल्यानंतर पुणे महानगरपालिकेने येरवड्यातील क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे ई-लर्निंग स्कूलमध्ये स्वॅब तपासणी केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गावर काही प्रमाणात प्रतिबंध करण्यात यश आल्याचे आशादायक चित्र आहे.

येरवडा आणि महात्मा गांधी 
पूर्वी मेंटल हॉस्पिटल आणि जेल ही येरवड्याची ओळख होती. मात्र, याच येरवड्यातील आगाखान पॅलेसमध्ये 1942 ते 1944 दरम्यान महात्मा गांधीजींना नजरकैदेत ठेवले होते. भारतीय सर्वेक्षण व भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग हे केंद्र सरकारची तर विक्रीकर भवन, राज्य आरोग्य भवन, जिल्हा भूमी अभिलेख ही राज्य सरकारची महत्त्वाची कार्यालये आहेत. यासह पुरातत्त्व व संस्कृत विषयातील देशातच नव्हे तर, जगभरात ख्याती असलेले डेक्कन कॉलेज याच येरवड्यात आहे. सत्तरच्या दशकात शहरातील महत्त्वाच्या ठिकाणच्या व मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या वस्त्यांचे स्थलांतर करून ते लक्ष्मीनगरच्या दगडखाणीत वसविले. तब्बल दोन ते तीन दशकानंतर येथील दारिद्य्र, बेरोजगारी, निरक्षरता, अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात कमी झाली. येथील घरकुल योजना, साक्षरतेचे वाढलेले प्रमाण, आरोग्याच्या सोईसुविधा, रोजगाराच्या मिळालेल्या संधींमुळे येथील रहिवाशांच्या राहणीमानात सुधारणा झाली. आता मात्र, कोरोनाच्या संसर्गाच्या दाट छायेतून येथील जनता बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत आहे. 

येरवड्याची दाट लोकवस्ती कोरोनाला पोषक
येरवडा प्रभाग क्रमांक सहा अवघ्या तीन किलोमीटर चौरस क्षेत्रफळात अतिशय दाट लोकवस्तीचा परिसर आहे. त्यामुळं या परिसरात कोरोना झपाट्यानं पसरला. लक्ष्मीनगर, मदर तेरेसानगर, कंजार भाटनगर, शनिआळी, वडारवस्ती, यशवंतनगर, सुभाषनगर, गणेशनगर, अशोकनगर, विडीकामगार वसाहत, सुरक्षानगर, जय जवाननगर, रामनगर, नाईकनगर, पांडुलमाण वस्तीसह येरवडा व नवी खडकी गावठाणाचा समावेश होतो. बहुसंख्य मुस्लिम, भटके व विमुक्त, मातंग, मराठा, नवबौद्ध, गुजराथी- राजस्थानी समाजाचे वास्तव्य आहे. या परिसरातील रहिवासी कचरा वेचक, बांधकाम मजूर, धुणीभांडी करणाऱ्या महिला, रिक्षा, कॅब व टेम्पो चालक, भाजी व फळ विक्रेत्यांपासून ते सरकारी व खासगी कंपन्यांमध्ये सफाई कर्मचाऱ्यापासून ते विविध पदावर कार्यरत आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

घरकुल योजनांमुळे वस्त्यांचा कायापालट
केंद्र सरकारच्या वाल्मीकी- आंबेडकर, बेसिक सर्व्हिसेस टु अर्बन पुअर (BSUP) योजने अंतर्गत येथील शेकडो झोपड्यांचे सुंदर अशा घरकुलात रूपांतर झाले. महानगरपालिकेच्या विकासकामांमुळे गल्ली- बोळ कॉक्रिटिकरण, सांडपाणी, जलवाहिन्या, वीज वाहिन्या भूमिगत झाल्यामुळे येथील रहिवाशांचे राहणीमान बदलले. तरी सुद्धा बेरोजगारी, व्यसनाधीनता, संघटित गुन्हेगारीमुळे येरवडा नेहमी चर्चेत राहिले आहे. आता कोरोनाच्या संसर्गात संवेदनशील परिसर (कंटेन्मेट झोन) म्हणून घोषित झाले आहे. त्यामुळे येथील हातावरचे पोट असलेले नागरिक हवालदिल झाले आहेत. 

लॉकडाउनमध्येही हातभट्या सुरूच 
कंटेन्मेट परिसर असून देखील हातभट्या राजरोसपणे सुरू होत्या. परिसरात दारूविक्री होत असल्यामुळे तळीराम रात्रभर फिरताना आढळत होते. पोलिसांनी अवैध धंद्यांवर केलेले दुर्लक्ष, सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा, नागरिकांनी आरोग्य तपासणीसाठी व सर्व्हेक्षणासाठी आलेल्या स्वयंसेवक व कर्मचाऱ्यांना केलेला असहकार, बेशिस्त वागणूक यामुळेच कोरोनाचा संसर्ग येरवड्यात दिवसेंदिवस झपाट्याने फैलावत असल्याचे चित्र दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com