esakal | इंदापूरच्या तरुणाकडून किलीमांजारो सर 
sakal

बोलून बातमी शोधा

yogesh kare

योगेश करे या युवकाने आफ्रिका खंडातील टांझानिया येथील माउंट किलीमांजारो हे बर्फाच्छादित शिखर सर करत भारतीय प्रजासत्ताकदिनी ७१ फुटांचा तिरंगा ध्वज फडकविला. 

इंदापूरच्या तरुणाकडून किलीमांजारो सर 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

इंदापूर - अतिशय खराब वातावरण, शून्य अंश सेल्सिअसच्या खाली असणारे तापमान, घोंघावणारे वारे, उभी चढण, कोसळणारा बर्फ यावर मात करत करेवाडी (ता. इंदापूर) येथील योगेश करे या युवकाने आफ्रिका खंडातील टांझानिया येथील माउंट किलीमांजारो हे बर्फाच्छादित शिखर सर करत भारतीय प्रजासत्ताकदिनी ७१ फुटांचा तिरंगा ध्वज फडकविला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

योगेश याचे वडील मनोहर हे शेतकरी असून, त्याचे संपूर्ण कुटुंब शेतीव्यवसाय करत आहे. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात तो शास्त्र शाखेच्या पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. लहानपणापासून त्याला ट्रेकिंगचा छंद असून, राज्यातील सर्वांत उंच कळसूबाई शिखरासह त्याने अनेक दुर्गम किल्ल्यावर यशस्वी चढाई केली आहे. सह्याद्रीच्या निसर्गरम्य वातावरणात त्याला फिरायला आणि या माध्यमातून नवनवीन संकल्पना युवकापर्यंत पोचवणे आवडते.  

कळसूबाई शिखर सर केल्यानंतर त्याने किलीमांजारो हे शिखर सर करण्याचा निश्‍चय केला. सोलापूर येथील ट्रेकर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने मुंबई येथील रोहित पाटील, कोल्हापूर येथील सागर नलवडे व उत्तर प्रदेशातील पोलिस जवान आशिष दीक्षित यांच्यासह त्याने ही यशस्वी चढाई पूर्ण केली. ते २२ जानेवारीपासून चार दिवसांचा खडतर प्रवास करत २५ जानेवारी रोजी शिखराच्या अंतिम बेसकॅम्पला पोचले. २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता या शिखरावर त्यांनी यशस्वी चढाई केली. समुद्रसपाटीपासून १९ हजार ३४१ फूट असलेल्या या शिखरावर त्यांनी ७१ फुटांचा तिरंगा ध्वज फडकवला. जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी या यशाबद्दल योगेश याचे कौतुक केले.

भारतीय संविधानाच्या गौरवासाठी
योगेश करे व त्याच्या सहकाऱ्यांनी माउंट किलीमांजारो शिखरावर तिरंगा झेंडा फडकविल्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून विश्‍वविक्रम केला. भारतीय राज्यघटनेतील समता, बंधुता, एकात्मता व सर्वधर्मसमभाव या तत्त्वांचा जागतिक पातळीवर उद्‌घोष करण्यासाठी त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी हा लक्षवेधी उपक्रम राबविला.

loading image
go to top