त्याने अचानक टेम्पो थांबविला अन् मग...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

-अचानक थांबलेल्या टेम्पोला पाठीमागुन दुचाकीची धडक.
-गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू 
 

पुणे : महामार्गावरुन जाणारा टेम्पो अचानक थांबल्याने पाठीमागुन येणाऱ्या दुचाकीची टेम्पोला जोरदार धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजता वारजे येथील डुक्करखिंड येथे घडली. 

आणखी वाचा - पुण्याची सूत्रं हाती घेताच नव्या आयुक्तांनी काय केलं?

मोहम्मद शकील अब्दुल सत्तार (वय 27, रा. मानाजीनगर, नऱ्हे ) असे अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई राजू युसुफ शेख यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी कंपनीमध्ये काम करणारा मोहम्मद सत्तार हा शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता कंपनीतील आपले काम संपवुन त्याच्या दुचाकीवर महामार्गावरील चांदणी चौकाकडून  येत होता. त्याचवेळी डुक्करखिंड रस्त्यावर चालक त्याच्या ताब्यातील पांढरा टेम्पो वाहतुकीला अडथळा येईल, अशा पद्धतीने चालवित होता. त्याचवेळी त्याने त्याचा टेम्पो अचानक थांबविला. त्यामुळे पाठीमागुन आलेल्या मोहम्मद सत्तार याची दुचाकी टेम्पोवर जोरदार आदळली. या अपघातात सत्तार गंभीर जखमी झाला. तो अचानक थांबलेल्या टेम्पोला जाऊन धडकला. नागरीकांनी त्यास तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु गंभीर जखमी झाल्याने रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या अपघातानंतर  टेम्पो चालक टेम्पो तेथेच सोडून पळून गेला. त्याच्यावर अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रामदास शेवते करत आहे.

आणखी वाचा - इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, तिघांना अटक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A young man died in an accident