व्हिडिओ बेतला जीवावर; खडकवासला धरणात बुडून तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aashish Furange
व्हिडिओ बेतला जीवावर; खडकवासला धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

व्हिडिओ बेतला जीवावर; खडकवासला धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

किरकटवाडी - उंचावर चढून पाण्यात उडी मारण्याचा व्हिडिओ (Video) काढणे एका तरुणाच्या (Youth) जीवावर बेतले आहे. (Death) आशिष सुभाष फुरंगे(वय 18, रा. कर्वेनगर) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. खडकवासला धरणातील खडकवासला गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊस जवळ ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आशिष सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याच्या इतर दोन मित्रांसोबत खडकवासला धरणात पोहण्यासाठी आला होता. पाण्यात उडी मारतानाचा व्हीडिओ काढण्यासाठी आशिष खडकवासला गावच्या पंप हाऊसच्या कठड्यावर चढला. त्याचा मित्र व्हिडिओ काढत होता. आशिषने पाण्यात उडी मारली परंतु तो वर आला नाही. त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

याबाबत माहिती मिळताच बंदोबस्तासाठी तैनात असलेले वाहतूक पोलीस हवालदार विलास बांबळे, कॉन्स्टेबल प्रविण ताकवणे, होमगार्ड शांताराम राठोड व गोगावले तातडीने घटनास्थळी गेले. पोलीसांनी आशिषचा शोध घेण्यासाठी पीएमआरडीए च्या नांदेड सिटी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन केंद्र प्रमुख सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय काळे, पंकज माळी, योगेश मायनाळे,शरद माने, किशोर काळभोर व सोन्याबापू नागरे या जवानांनी आशिषचा मृतदेह शोधून काढला. पाण्यात उडी घेतल्यानंतर डोक्याला मार लागून गंभीर दुखापत होऊन आशिषचा मृत्यू झाला असण्याची शक्यता उपस्थित पोलीसांनी व्यक्त केली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.