Pune News : तुटलेला हात तरुणाला मिळाला परत

‘ससून’मधील डॉक्टरांकडून हात जोडण्याची शस्त्रक्रिया यशस्वी
Sasoon Doctor Treatment
Sasoon Doctor Treatmentsakal

पुणे - बारामतीमध्ये कणीक मळण्याचे यंत्र चालवत असताना तरुणाचा उजवा हात मशिनमध्ये अडकला. काही समजण्यापूर्वीच त्याचा हात कोपरा आणि मनगटामधून तुटला. रुग्णाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर हात जोडण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यामुळे ससून रुग्णालयाने तरुणाचा तुटलेला हात त्याला परत मिळवून दिला.

तरुणाचा हात तुटल्याची घटना २३ मे रोजी सकाळी सहाच्या सुमारास घडली. त्यानंतर रुग्णाला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णाची स्थिती कशी होती?

यंत्रात अडकल्याने रुग्णाच्या उजव्या हाताच्या नसा मुळापासून तुटल्या होत्या. रक्तस्राव झाला होता. अशा स्थितीत रुग्णाला ससून रुग्णालयात दाखल केले. प्लॅस्टिक सर्जरी विभागातील डॉ. अंकुर कारंजकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने शस्त्रक्रिया केली. त्यात डॉ. पियुष बामणोदकर, डॉ. आदित्य मराठे, डॉ. रणजित पाटील, डॉ. कौशिक दास, डॉ. प्रतीक पाल आणि डॉ. सुजित क्षीरसागर यांचा समावेश होता.

त्यांना डॉ. पराग सहस्रबुद्धे आणि डॉ. निखिल पानसे यांनी मार्गदर्शन केले. ट्रॉमा ऑपरेशन थिएटरमध्ये सात तास शस्त्रक्रिया सुरू होती. प्लॅस्टिक सर्जरी, अस्थिव्यंगोपचार सर्जरी, भूलशास्त्र, इंटेन्सिव्हिस्ट, ऑपरेटिंग रूम आणि अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका यांसारख्या विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांनी सांघिक कामगिरी केल्याने रुग्णाचा हात जोडणे शक्य झाले आहे.

पंधरा दिवसांनंतरची स्थिती

प्रत्यारोपणानंतरच्या शस्त्रक्रियेनंतर पंधराव्या दिवशी रुग्णाचा उजवा हात कार्यक्षम आहे. रुग्णावर दररोज ड्रेसिंग आणि प्रतिजैविक उपचार होत आहेत. हाताची कार्यक्षमता वाढविण्यासाठी भविष्यातील प्रक्रियांसाठी योजना आखल्या जात आहेत. ज्यामुळे रुग्णाच्या जोडलेल्या हाताच्या कार्यक्षमतेमध्ये आणखी प्रगती होईल.

रुग्णकेंद्रीत व्यवस्थेचे उत्तम उदाहरण

पोर्श मोटार अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातील दोन अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात रुग्णालयाची प्रतिमा डागाळली गेली. सक्तीच्या रजेवर पाठविलेले बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या कार्यक्षमतेवरही यातून अनेक प्रश्न निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालय प्रशासनाने तेथील व्यवस्था बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून रुग्णकेंद्रीत व्यवस्था उभी करण्यात येत आहे. त्याची ही यशोगाथा असल्याची भावना रुग्णालय प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आली.

कशी केली शस्त्रक्रिया?

नवीन तंत्रांचा वापर करून रुग्णाला एक विशेष प्रकारची भूल देण्यात आली. रुग्णाच्या हाताच्या नसांमध्ये अल्ट्रासाऊंड मार्गदर्शित भूल दिली. ज्यामुळे रुग्ण पूर्ण शुद्धीत असूनही त्याचा हात संवेदनारहित होता. या किचकट प्रक्रियेत हाताच्या धमन्या, शिरा, नसांना सूक्ष्मदर्शक अचूकतेने जोडणे आणि हाताच्या दोन्ही हाडांना धातूच्या पट्ट्यांनी जोडण्यात आले. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला ४ युनिट रक्त आणि २ युनिट फ्रोझन प्लाझ्मा देण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला ट्रॉमा आयसीयूमध्ये (अतिदक्षता विभागात) ३ दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.

अडथळे कोणते होते?

शरीराच्या एखाद्या अवयवाचा रक्तपुरवठा खंडित झाल्यानंतरही पेशी काही काळ जिवंत राहतात. त्या कालावधीला वैद्यकीय परिभाषेत क्रिटिकल इस्केमिया म्हणतात. या रुग्णाच्या तुटलेल्या हातामध्ये गंभीर इजा झाल्या होत्या. बारामतीवरून ससून रुग्णालयात येईपर्यंत सहा तासांचा वेळ गेला होता. हे शस्त्रक्रिया यशस्वी होण्यातील प्रमुख अडथळे होते.

हा वेळ गेल्याने त्याचा थेट धोका मूत्रपिंड, यकृत अशा अवयवांच्या कार्यक्षमतेला बसतो. जखम झालेल्या भागातील मृत पेशींमुळे संसर्गाचा धोका वाढतो. ही आणि अशी सगळी आव्हाने असताना ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रियेच्या आव्हानाचा निर्णय घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com