दारु पिताना वाद झाला अन् त्याने मित्राचाच खून केला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जुलै 2020

विशाल आणि विकी १० मे रोजी हडपसर येथे रेल्वेरुळाच्या पलीकडे असलेल्या नाल्याचा जवळील झाडाखाली दारू पीत बसले होते. तेथे त्यांच्यात वाद झाला.

पुणे : मद्यपान करीत असताना झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा गळा आवळून खून केल्याची घटना उघड झाली आहे. या गुन्ह्यातील मृतदेह हडपसर येथील कॅनॉलमध्ये टाकण्यात आला होता. कॅनॉलमधून वाहत गेलेला मृतदेह यवत येथे सापडला. आरोपी मित्राला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली.

विशाल ऊर्फ विकी राजू पिल्ले (वय २४, रा. हिंगणेमळा, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या खून प्रकरणी विकी अशोक रणदीवे (रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. १० मे रोजी हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून विशाल बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचा भाऊ चेतन राजू पिल्ले यांनी दिली होती.

दिवाणजीला लुटणाऱ्या तिघांना २४ तासांत पोलिसांनी ठोकल्या बेड्या!​

१५ मे रोजी यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत कॅनॉलमध्ये एका व्यक्‍तीचा कुजलेला मृतदेह वाहत आला होता. त्यानंतर १८ मे रोजी चेतन याला मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बोलवले होते. त्याने हा मृतदेह विशालचाच असल्याचे सांगितले. दरम्यान, गुन्ह्याच्या तपासादरम्यान विशालचा मित्र रणदिवे याने त्याचा खून केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने रणदिवेच्या हालचालीवर पाळत ठेवली. त्याच्या हालचालीही संशयास्पद आढळून आल्यानंतर त्याला तपासासाठी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 

वॉचमन त्याच घरात दुसऱ्यांदा चोरी करायला गेला अन्...​

अपर पोलिस आयुक्‍त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्‍त बच्चन सिंग, सहायक पोलिस आयुक्‍त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलिस निरीक्षक जयंत जाधव, पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, सहायक फौजदार यशवंत आंब्रे, पोलिस कर्मचारी किशोर वग्गू, मोहसीन शेख, चंद्रकांत महाजन, गोपाळ मदने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

रात्री उशिरा मृतदेह कॅनॉलमध्ये टाकला : 
विशाल आणि विकी १० मे रोजी हडपसर येथे रेल्वेरुळाच्या पलीकडे असलेल्या नाल्याचा जवळील झाडाखाली दारू पीत बसले होते. तेथे त्यांच्यात वाद झाला. त्यातून रणदिवेने विशालचा गळा आवळून खून केला. यानंतर रणदिवे घरी गेला आणि रात्री उशिरा घटनास्थळावर आला. त्याने विशालचा मृतदेह कारमध्ये ठेवून हडपसर ससाणेनगर येथील कॅनॉलवर जाऊन टाकून दिला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The young man murdered his friend after drinking liquor