आईसोबत बोलत थांबलेल्या तरुणावर हल्ला; तिघांनी लोखंडी सळईने केले वार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

नीलेश जोगदंड (वय 32, रा. दांडेकर पूल) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : घरासमोर आईसमवेत बोलत थांबलेल्या तरुणाला किरकोळ कारणावरून लोखंडी सळईने जबर मारहाण करण्याचा प्रकार घडला. या मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (ता.१०) रात्री नऊ वाजता दांडेकर पूल परिसरामध्ये घडली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे- मुंबई 'एक्सप्रेस वे'वर दोन अपघात; दोघांचा मृत्यू

नीलेश जोगदंड (वय 32, रा. दांडेकर पूल) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जोगदंड हे बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरासमोर आईशी बोलत थांबले होते. त्यावेळी त्यांच्या जवळून एक व्यक्ती जात होता. त्यावेळी फिर्यादीने त्याच्याकडे पाहिले. तेव्हा संबंधित व्यक्ती तरुणाकडे आला. त्याने फिर्यादी यांना 'माझ्याकडे काय बघतो' असे म्हणत फिर्यादीसमवेत वाद घालण्यास सुरवात केली.

पुण्यात IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचे वयाच्या 34 व्या वर्षी निधन​

त्यानंतर त्याने त्याच्या दोन मित्रांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनीही फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी आणि त्याच्या मित्रांनी त्यांच्याकडे असलेल्या लोखंडी सळईने फिर्यादीच्या हातावर, पायावर जबर मारहाण केली, त्यामध्ये फिर्यादी हे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर आरोपी तेथून पळून गेले. फिर्यादी यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात उपचारासांठी दाखल केले. फिर्यादी यांनी उपचार घेतल्यानंतर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण तपास करीत आहेत.

- पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man seriously injured in attack with iron rod in Dattawadi