पुण्यात IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचे वयाच्या 34 व्या वर्षी निधन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

सुधाकर शिंदे हे त्रिपुरावरुन आपल्या मूळ गावी नांदेड येथे 15 दिवसांच्या सुट्टीसाठी आले होते.

पुणे : महाराष्ट्रातील नांदेडचे मूळ रहिवासी आणि त्रिपुरा केडरचे आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचं काल निधन झालं. त्यांचं वय अवघे 34 वर्षे होते. सुधाकर शिंदे हे त्रिपुरावरुन आपल्या मूळ गावी नांदेड येथे 15 दिवसांच्या सुट्टीसाठी आले होते. मात्र, घरी आल्यावर त्यांना थोडा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर आधी नांदेड येथे उपचार झाले. त्यानंतर त्यांना औरंगाबाद येथेही उपाचारासाठी नेण्यात आलं. मात्र, त्यांची प्रकृती अधिकाधिकच खालावत गेल्याने त्यांना पुण्यात उपाचारासाठी आणलं गेलं. त्यांना कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची याबाबतची चाचणी करण्यात आली होती. परंतु, दोन वेळा कोरोनाची चाचणी करुनही त्यांचे दोन्ही अहवाल हे निगेटीव्ह आले होते. 

हेही वाचा - मुख्यमंत्री योगींनी राजीनामा द्यावा; पुण्यात मातंग समाजाची मागणी

सुधाकर शिंदे हे 2015 सालच्या बॅचचे त्रिपुरा केडरचे आयएएस अधिकारी होते. त्यांना अचानक सुरु झालेल्या त्रासामुळे पुण्यातील रुबी रुग्णालयात ऍडमिट केले होते. पुण्यात सुरु असलेल्या उपचारांदरम्यान त्यांचे काल निधन झालं असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. शिंदे यांच्या पश्चात त्यांची पत्नी, लहान मुलगा आणि परिवार आहे.

त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
एका आयएएस अधिकाऱ्याचा वयाच्या 34 वर्षी मृत्यू होण्याच्या घटनेने हळहळ निर्माण झाली आहे. सर्व स्तरातून सुधाकर शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांनीही शिंदे यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. विप्लवकुमार देव यांनी ट्विट करुन म्हटलंय की, आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. त्यांच्या निधनामुळे त्रिपुरा राज्याने एक मृदू स्वभावाचा कर्तबगार असा अधिकारी आज गमावला आहे. त्यामुळे राज्याची आज मोठी हानी झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांच्या पत्नीशी संपर्क साधून त्यांचे सांत्वन केल्याचीही माहिती दिलीय. 

हेही वाचा - भाजपशी जवळीकता नडली; काँग्रेस आमदाराची पक्षातून हकालपट्टी

त्यांच्या निधनाबद्दल सगळीकडे दु:ख व्यक्त होत असून सोशल मीडियातूनही अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्रिपुरातील कारागृहांचा कायापालट करण्याची उल्लेखनीय कामगिरी करणारा हरहुन्नरी आयएएस अधिकारी आज आपल्यातून निघून गेला, अशा भावना आयएएस प्रियंका शुक्ला यांनी व्यक्त केल्या. तसेच आयएएस अवनिश शरण यांनीही त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tripure IAS Officer Sudhakar Shinde Dies 34 years