पुणे : सिंहगडावरून तरुण पडला पण...(व्हिडिओ)

राजेंद्रकृष्ण कापसे
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

- पंधरा तासांहून अधिक वेळ पडून होता दरीत.

- वन विभाग स्थानिकांची त्याला मिळाली मदत.

खडकवासला : सिंहगडावरील सांबरेवाडीच्या कड्यावरून गुरुवारी संध्याकाळी दीडशे-दोनशे फूट खाली तरूण पडला. रात्रभर तो कड्याला जंगलात पडून होता. गडावर याची कोणाला माहिती नव्हती. शुक्रवारी सकाळी नागपूरहून नातेवाईक आल्यावर वन विभाग, स्थानिक नागरिकांनी त्याला शोधून काढले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रवीण अरुण ठाकरे (वय 27, रा.कर्वेनगर) असे त्या युवकाचे नाव आहे. तो नागपूर येथील चिंचोली येथील आहे. तो पुण्यात टेक महिंद्रा कंपनीत काम करतो. त्याला शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता त्याला बाहेर काढण्यात यश आले. खांदा पाठ व मनगटाला मुक्का मार लागला आहे. त्याला वाहनतळ येथे आणले असून, खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. 

प्रवीण गुरुवारी दुपारी एकटाच सिंहगडावर आला होता. गडावर फिरत फिरत तो छत्रपती राजाराम महाराज समाधीच्या मागील बाजूस सांबरेवाडीच्या कड्याला पोचला. येथे एमटीडीसी जुनी इमारतीच्या मागील बाजूने संध्याकाळी सहा वाजता तो कड्याच्या टोकाला जाऊन तो सूर्यास्ताचे फोटो घेत होता. त्यावेळी अचानक तोल गेल्याने तो खाली पडला.

जेएनयू बंद करण्याचा 'या'; भाजपनेत्याने दिल्ला सल्ला

सांबरेवाडीच्या कड्याला बाजूस वस्ती नाही. पर्यटन विभागाच्या इमारतीच्या मागील पर्यटक जात नाहीत. तसेच त्या भागात कोण जात नसल्याने आणि पडताना कोणताही आवाज झाला नाही. तो पडल्याची कोणती माहिती मिळाली नाही.

प्रवीण नोकरी निमित्ताने पुण्यात राहत होता. बहीण करुणा याचा वाढदिवस असल्याने त्याने गुरुवारी संध्याकाळी पाऊणे सहा वाजता तो त्यांच्याशी बोलला होता. त्यावेळी, तो व्यवस्थित होता. 

करुणा ठाकरे म्हणाल्या, संध्याकाळी त्याच्या आईने फोन केला होता. त्यावेळी त्याचा आवाज वेगळा आला. तो आजारी असावा म्हणून ते त्याला भेटण्यासाठी नागपूरहून पुण्याला निघाले. रात्री दीड वाजता त्याने त्यांना मोबाईलवर लोकेशन पाठविले. त्यानुसार शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता सिंहगडला पोचले."

तो नक्की कोठे आहे हे समजत नव्हते म्हणून त्याची शोधण्याची मोहीम सुरू झाली. गडावर आल्यावर त्याला व्हिडीओ कॉल केला. त्यामुळे तो धरणाच्या बाजूला असेल असे समजले. त्यानुसार, गडावरील वन विभाग व स्थानिक नागरिकांनी त्याचा शोध घेतला. गडावरून दरीत आवाज दिला. त्याचा दरीतून बाजूने प्रतिसाद आल्याने त्याला शोधण्यासाठी स्थानिक नागरिक पश्चिम बाजूने खाली उतरले. यामध्ये वनरक्षक बाळासाहेब जीवडे, घेरा सिंहगडचा उपसरपंच अमोल पढेर, वन विभागाचे सुरक्षा रक्षक असे 30-35 जण मदतीला धावले. तसेच, गिरिप्रेमीचे ट्रेकर कर्मचारी तेथे होते. तेदेखील दोर लावून खाली उतरले. त्यांचे सिद्धार्थ जाधव, अतुल मुरमुरे दरीत उतरले होते. वन विभागाने रुग्णवाहिका गडावर बोलविले होती. 

त्याच्या मनगटाला, खांदा व पाठीला मुका मार लागल्याने अंतर्गत फ्रॅक्चर जखमा इजा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, प्रवीण सुमारे पंधरा तासाहून अधिक वेळ पडून होता. तो थोडा बेशुद्ध होता. पाय व पाठ बधीर झाल्याने त्याला उभे राहणे शक्य नव्हते. म्हणून त्याला स्ट्रेचर ठेऊन गडावर आणले. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

प्रवीणचे एमबीए (फायनान्स आणि इंटरनॅशनल बिझनेस) पर्यत शिक्षण झाले असून, टेक महिंद्रा कंपनीत काम करत असल्याचे त्याच्या नातेवाईकाने सांगितले.

स्थानिकांची मदत मोलाची 

आम्ही रात्रभर प्रवास करून गडावर सकाळी साडेनऊ वाजता पोचलो. वन विभाग व स्थानिक नागरिक यांना माहिती दिली. कोठे पडला हे माहित नव्हते तरी त्याला शोधून दीडशे फूट खोल जाऊन त्याला वाहनतळ येथे आणण्याची किमया स्थानिक नागरिकांनी केली. आम्ही अनोळखी असूनही झालेली मदत मोलाची आहे. त्याच्यावर योग्यवेळी उपचार सुरू झाले. 

- करुणा ठाकरे, जखमी प्रवीण ठाकरे याची बहीण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Youth Fall down from Sinhgad Fort