esakal | राजभवनमधील शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देतोय इंदापूरचा तरुण
sakal

बोलून बातमी शोधा

nilesh-raskar.jpg

राजभवनमधील शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देतोय इंदापूरचा तरुण

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे.
निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन, राज्यपाल द्रौपदी र्मुमू, मुख्यमंत्री रघुवर दास, राज्यपालाचे सचिव एस. के. सत्पथी आदींनी त्याच्या कार्याचे कौतुक केले आहे. पंडीत श्री. श्री. रविशंकर यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे निलेश यास ही संधी मिळाली असून त्याच्या कार्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक व झारखंड राज्याचे जिव्हाळ्याचे जैविक नातं निर्माण झाले आहे.

निलेश याची निरवांगी येथे वडिलोपार्जीत बागायती शेती असून त्याचे प्राथमिक शिक्षण निरवांगी जिल्हा परिषद शाळा, अकरावी, बारावी निमसाखर येथील ऑर्टस, कॉमर्स अॅन्ड सायन्स कनिष्ठ महाविद्यालय तर बी. कॉम इंदापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात झाले. त्याने पुणे येथे इव्हेंट मॅनेजमेंट चा डिप्लोमा केला. त्यानंतर त्याने बंगलोर येथे जैविक शेतीचे प्रशिक्षण घेतले. इंदापूर येथे शिकत असताना त्याने अल्फाबाईट संगणक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य तुषार रंजनकर यांच्याकडे कमवा व शिका योजनेत काम करत आपले शिक्षण पुर्ण केले. इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे व पुणे येथील लेंड ए हॅंड इंडिया संस्थेच्या मुक्ता वर्तक यांचे त्यास मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य रंजनकर यांच्यामुळे त्यास इंदापूर रोटरॅक्ट क्लबचे सचिव तसेच पुणे विद्यार्थी सहाय्यक समिती मध्ये शिक्षण घेत असताना पर्यावरण, आरोग्य व समाजसेवा यामध्ये जनजागृतीची संधी मिळाली. त्यामुळे समाजसेवेचे संस्कार त्याच्यावर झाले.बंगलोर येथील आर्ट ऑफ लिव्हींग च्या जैविक शेती उपक्रमात त्याने सकारात्मक योगदान दिले. त्यामुळे त्याचा ओढा जैविक शेतीकडे वाढला असून त्यातून त्याची वाटचाल मोठी झाली आहे.

रविशंकर यांनी झारखंड राजभवनला भेट दिल्यानंतर त्यांना तेथे रासायनिक पध्दतीने शेती होत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी येथे जैविक शेती करण्याची संकल्पना राजभवनला दिली. त्यानंतर निलेश यास तेथे जैविक शेती करण्याची संधी मिळाली. एकूण ६२ एकर क्षेत्रात त्याने फळे, फुले, मशरूम, भाजीपाला,शोभेची व औषधी गुणधर्म असलेल्या ५ हजारहून जास्त झाडे लावली. त्यातून जैविक शेती विकसित झाली असून दरवर्षीप्रमाणे यंदा आयोजित फुल प्रदर्शनात ५ लाखाहून जास्त नागरिकांनी प्रदर्शनास भेटी दिली. एवढ्यावर न थांबता त्याने माती, पाणी व कचरा व्यवस्थापनात आदर्श निर्माण केला आहे. तसेच रांची लगत असलेल्या विविध गावातील शेतक-यांना त्यांनी मोफत प्रात्यक्षिकासह जैविक शेतीचे धडे दिले आहेत. शेतक-यांचा प्रतिसाद पाहून त्यांनी जैविक शेतीच्या प्रचारासाठी नंदी ग्रीन सोल्यूशन ही संस्था स्थापन केली असून त्याव्दारे त्याने किमान २० युवकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.  

loading image